मुंबई : पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी १६ वर्षांखालील मुंबई संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाची अर्जुनची वर्णी लागली असतानाच, शालेय क्रिकेटमध्ये हजार धावांची खेळी करणाऱ्या प्रणव धनावडेकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचा वाद काही दिवसांपासून सोशल नेटवर्कवर सुरू आहे. मात्र, प्रणवचे प्रशिक्षक मुबीन शेख यांनी हा वाद निरर्थक असल्याचे सांगताना प्रणवची निवड न होणे चिंतेची बाब नसल्याचे म्हटले आहे.शालेय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी नाबाद १००९ धावांची ऐतिहासिक खेळी केलेल्या प्रणवची मुंबई १६ वर्षांखालील संघात निवड झाली नाही. याच वेळी फलंदाजी व गोलंदाजीत अपयशी ठरलेल्या अर्जुन तेंडुलकरची निवड झाली. यामुळे संघनिवड प्रक्रियेवर खूप टीका होऊ लागली आणि याविषयी सोशल नेटवर्किंगवर खूप चर्चा झाली. याबाबर शेख यांनी ही बाब अधिक चिंतेची नसल्याचे सांगताना म्हटले, ‘‘पश्चिम विभागीय १६ वर्षांखालील संघात प्रणवची निवड न होण्यावरून अनेक वादविवाद ऐकले; परंतु आम्ही त्याबाबत अधिक विचार करीत नाही आणि अधिक त्रस्तही नाही. क्रिकेटमध्ये सर्व काही तुमच्या हातात नसते.’’ प्रणव आणि अर्जुनबाबत शेख म्हणाले, ‘‘या दोन्ही खेळाडूंमध्ये तुलना करणे उचित ठरणार नाही. हे दोघेही चांगले मित्र असून त्यांनी एकत्र क्रिकेट खेळले आहे. अर्जुन एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या वडिलांनी क्रिकेटसाठी खूप मोलाचे योगदान दिले असून, त्याचा आपल्याला अभिमान आहे.’’ शालेय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत १००९ धावांची ऐतिहासिक खेळी खेळल्यानंतर प्रणवने उपांत्य फेरीतहि दीडशतकी खेळी केली. मात्र, नंतर दहावीची परीक्षा असल्यामुळे तो अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता. (वृत्तसंस्था)एक हजार धावा बनवणे त्याच्या नशिबात होते. डावाची सुरुवात करताना तो खूप उत्साही होता; परंतु शानदार खेळी केल्यानंतर त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवले. कदाचित पुढील दोन वर्षांत तो १९ वर्षांखालील संघात प्रवेश करेल. त्याच्यावर दबाव टाकण्याची आमची इच्छा नाही. सध्या त्याला त्याच्या खेळाचा आनंद घेऊ दिला पाहिजे, असेही शेख यांनी सांगितले.विभागीय निवडीबाबत आम्ही काहीच सांगू शकत नाही. तसेच, आम्ही ऐतिहासिक खेळी केल्यानंतर प्रणवबाबत काहीच ऐकले नाही. त्याच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव आहे. जर का तो सातत्याने धावा काढण्यात यशस्वी झाला, तर नक्कीच आम्ही त्याची निवड करू.- पी. व्ही. शेट्टी, संयुक्त सचिवद्वमुंबई क्रिकेट असोसिएशन
प्रणवची निवड न होणे चिंतेची बाब नाही
By admin | Published: June 02, 2016 2:05 AM