नवी दिल्ली : गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्याला बराच कालावधी लागणार आहे; पण कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम राखण्यासाठी भविष्यात दिवस-रात्र कसोटी सामन्यांचे आयोजन होणे आवश्यक आहे, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले. भारतीय फिरकीपटू गुलाबी कुकाबुरा चेंडूने उपखंडातील खेळपट्ट्यांवर कशी कामगिरी करतील, याबाबत बोलताना कुंबळे म्हणाले, ‘‘सध्या आमचे लक्ष विंडीजमध्ये ‘लाल ड्युक्स’ चेंडूवर चांगली कामगिरी कशी करायची, यावर केंद्रित झाले आहे. आम्ही अद्याप गुलाबी चेंडूच्या कसोटीचा विचार केलेला नाही. गुलाबी चेंडूने कसोटी खेळण्यासाठी अद्याप बराच कालावधी शिल्लक आहे. आम्ही विंडीजमध्ये ड्यूक्सच्या लाल चेंडूने खेळणार आहोत. मी एका वेळी एकाच लढतीबाबत विचार करतो. आमच्यासाठी विंडीज दौरा महत्त्वाचा आहे. आम्ही गेल्या सहा दिवसांपासून लाल ड्यूक्स चेंडूने सराव केला. ज्या वेळी गुलाबी चेंडूने खेळायचे असेल त्या वेळी त्यावर लक्ष केंद्रित करू.’’भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आणि आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष असलेल्या कुंबळे यांनी कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम राखण्यासाठी दिवस-रात्र कसोटीचे समर्थन केले. कुंबळे यांनी विराट कोहली शानदार फलंदाज असल्याचे म्हटले. विराटसोबत काम करण्यास उत्सुक आहे. मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये त्याला अंडर-१९ पासून बघितले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तो परिपक्व क्रिकेटपटू झाला आहे. तो शानदार फलंदाज व कर्णधार आहे. तो आक्रमक असून मीसुद्धा आक्रमक आहे, असेही कुंबळे म्हणाले. विंडीजमधील खेळपट्ट्यांवर रवींद्र जडेजाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, अशी आशा असल्याचे कुंबळे यांनी या वेळी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
...अद्याप त्याचा विचार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2016 12:47 AM