ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - आयपीएलमधील वानखेडे येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान आवेष्टीत वस्तूंवर अधिक दर आकारल्याने वैध मापन शास्त्र विभागाने बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इंडिया (बीसीसीआय) व मुंबई क्रिकेट असोसिएशन (एससीए)या दोन्ही यंत्रणाना खुलासा करण्यासंबंधी नोटीस बजावली आहे.
स्टेडीयममधील विक्रेत्यांकडून छापिल किंमतीपेक्षा जास्त दराने वस्तूंची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार 16 मे रोजी अधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या भेटीत तीन विक्रेत्यांविरोधात कारवाई केली आहे.
वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता म्हणाले की, विभागाने केलेल्या तपासणीत गरवारे पॅव्हेलीयनच्या पहिल्या मजल्यावर मॅग्नेम कँडी आईस्क्रीम 75 रुपये छापिल किंमत असताना 100 रुपयांना विकली जात होती. तर गावस्कर स्टँडवरील स्टॉल क्रमांक 1 व 3 या दोन्ही स्टॉलवर 55 रुपये किंमतीचे कोरनॅटो आईस्क्रीम 60 रुपयांना विकले जात होते. छापिल किंमतीपेक्षा जास्त दराने आवेष्टीत वस्तू विकून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनांविरोधात खटले दाखल केल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.
स्टेडियममध्ये आवेष्टीत वस्तूंची विक्री छापिल किंमतीपेक्षा जास्त दराने होऊ नये, म्हणून बीसीसीआयच्या अनुपालन अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली, याबाबतचा खुलासा सादर करावा अशी विचारणा बीसीसीआयला विभागाने केली आहे. शिवाय राज्यातील कोणत्याही स्टेडीयममध्येआवेष्टीत वस्तू विक्रेत्यांकडून फसवणूक होत असल्यास वैध मापन शास्त्र विभागाच्या नियंत्रक कक्षास कळवावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.