नवी दिल्ली : आयपीएल-२०१३च्या भ्रष्टाचारप्रकरणी न्यायाधीश लोढा समितीच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कार्यसमूहानेदेखील भागधारकांच्या सूचना संकलित केल्या आहेत आणि ते बीसीसीआय कार्य समितीच्या २८ आॅगस्टला कोलकाता येथे होणाऱ्या बैठकीत आपला अंतिम अहवाल सोपवणार आहेत.आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज राजधानीत कार्यसमूहाच्या अखेरच्या बैठकीनंतर म्हटले, ‘‘आम्ही भागधारकांच्या सर्वच सूचना संकलित केल्या आहेत आणि आम्ही अंतिम अहवाल बीसीसीआय कार्य समितीला सोपवणार आहे. ही बैठक २८ आॅगस्टला कोलकाता येथे होणार आहे.’’कार्यसमूहात शुक्ला यांच्याशिवाय बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी, आयपीएल संचालन परिषदेचे सदस्य सौरभ गांगुली यांचा समावेश होता. मंडळाचे वकील उषा नाथ बॅनर्जी यांची त्यांना मदत लाभत आहे.शुक्ला म्हणाले, ‘‘खूप काही सूचना मिळाल्या आहेत; परंतु आम्ही बैठकीविषयी काही सांगू शकत नाही.’’ वृत्तानुसार प्रीती झिंटा यांच्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या काही खेळाडूंचा कथितपणे संशयित घटनांत सहभागी होण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शुक्ला यांनी स्पष्ट केले. आपल्या माहितीनुसार प्रीती झिंटा यांनी स्वत:च याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे याविषयीची चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. काही खेळाडू चांगले खेळत नसल्यामुळे त्यांना प्रीती झिंटा यांनी सुनावल्याचा हवाला एका वृत्तात देण्यात आला होता. त्या खेळाडूंना सामन्यातून बाहेर करण्यात आले आणि एवढेच नव्हे, तर त्यांना लिलावासाठी ठेवण्यात आले. तथापि, प्रीती झिंटा यांनी या दाव्याचे खंडन केले आहे. आजच्या बैठकीत आयपीएल सीओओ सुंदररमन, बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी समितीचे प्रमुख नीरजकुमार यांनी सहभाग नोंदविला.ठाकूर यांनी कार्यसमूहाची प्रक्रिया गोपनीय असून, जे काही बोलले जात आहे तो फक्त अंदाज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्ही वेळेआधी आमचे काम पूर्ण केले आहे. सर्वच सूचनांवर चर्चा झाली. तसे प्रथम संचालन परिषद आणि नंतर कार्य समितीला २८ आॅगस्ट रोजी अहवाल सोपवणार आहोत. राजस्थान, चेन्नईच्या भवितव्यावर होणार निर्णयभारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) कार्यकारी समिती लवकरच चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या भवितव्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.बीसीसीआयची कार्यकारी समिती २८ आॅगस्ट रोजी आयपीएल कार्यकारी समूहाच्या अहवालावर चर्चा करू शकते. ज्यात दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई आणि राजस्थानच्या भवितव्यावर निर्णय घेतला जाईल. बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची बैठक कोलकाता येथे होणार आहे.न्यायाधीश लोढा समितीचे आदेश लागू करणे आणि टष्ट्वेंटी- २० लीगच्या आगामी सत्राच्या स्वरूपावरील निर्णय पाहता, आयपीएल कार्यकारी समूहाने याविषयी बुधवारी अखेरची बैठक घेतली. यादरम्यान आयपीएल चेअरमन आणि कार्यकारी समूहाचे सदस्य राजीव शुक्ला यांनी हा अहवाल आधी आयपीएलच्या संचालन परिषदेकडे समीक्षेसाठी पाठविला जाईल, असे सांगितले.उल्लेखनीय बाब म्हणजे, न्यायाधीश लोढा समितीने आयपीएल सहाच्या भ्रष्टाचारप्रकरणी दोषी आढळलेल्या राजस्थान आणि चंन्नई या संघांना दोन वर्षांसाठी निलंबित केले होते. शुक्ला यांनी आयपीएल २०१६च्या सत्रात ८ संघ असतील; परंतु त्यांनी चेन्नई आणि राजस्थान यांच्या जागी अन्य कोणता संघ असेल, याविषयी माहिती दिली नाही.
सूचना संकलनाचे काम समाप्त
By admin | Published: August 19, 2015 11:10 PM