ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील सेमीफायनल लढतीत आघाडी घेत खेळाला सुरुवात करणाऱ्या नोव्हाक जोकोविचवर अर्ध्यावरच डाव मोडण्याची वेळ आली. मांडीच्या दुखापतीमुळे खेळणं अशक्य झाल्यामुळे अॅलेक्झांडर झ्वेरेव्हला वॉकओव्हर देत तो ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे यंदाच्या ग्रँडस्लॅमच्या स्पर्धेतून तो बाहेर पडला असून अॅलेक्झांडर झ्वेरेव्हनं फायनलमध्ये प्रवेश केला आहे. चांगली सुरुवात केल्यावर पहिला सेट ७-६ (५) गमावताच जोकोविचनं मॅचमधून माघार घेतल्याचे पाहायला मिळाले. त्याचा हा निर्णय दिग्गज टेनिस स्टारच्या निवृत्तीचे संकेत देणारा आहे. जोकोविचनं मात्र अधिकृतरित्या यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मॅचनंतर काय म्हणाला जोकोविच?
मॅचमधून माघात घेतल्यावर नोव्हाक जोकोविच म्हणाला की, "मला पुढेही खेळत राहण्याची इच्छा आहे. पण पुढच्या वर्षी माझं शेड्युल कसं आहे. याची खात्री वाटत नाही. मला ऑस्ट्रेलियात खेळायला आवडते. माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मी इथंच मिळवलं आहे." असे तो म्हणाला आहे.
उपांत्य फेरीतील लढतीत झाली होती दुखापत
उपांत्यपूर्व फेरीतील कार्लोस अल्काराझ विरुद्धच्या लढतीवेळीच जोकोविच मांडीच्या स्नायूनं त्रस्त दिसला होता. या परस्थितीत लढवय्या वृत्ती दाखवून त्याने स्पर्धेत आगेकूच केली. या मॅचमध्ये त्याला मेडिकल टाइमआउट दिल्यामुळेही टीका झाली होती. या मॅचनंतर जोकोविचनं म्हटलं होते की, जर दुसरा सेट गमावला असता तर त्याच वेळी स्पर्धेतून बाहेर पडलो असतो, असे वक्तव्य त्याने केले होते. सेमी फायनलमध्ये तिच गोष्ट घडली. पहिला सेट गमावणाऱ्या अॅलेक्झांडर झ्वेरेव्ह याने दुसरा सेट नावे करताच जोकोव्हिचनं त्याला वॉकओव्हर दिला.
लढवय्या खेळाडूच्या निर्णयाचा प्रतिस्पर्ध्यानं केला आदर
१० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणारा नोव्हाक जोकोविच याने सेमी फायनलआधी प्रॅक्टिस सेशन वगळले होते. 0मांडीला पट्टी बांधूनच तो मॅचसाठी मैदानात उतरला होता. जोकोविचच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांनी त्याची थट्टा केल्याचा प्रकारही घडला. पण यावेळी अॅलेक्झांडर झ्वेरेव्ह पुढे आला अन् त्याने दिग्गज जोकोविचच्या निर्णयाचा सन्मान करा, असे आवाहन प्रेक्षकांना केले. याआधी जोकोविचनं हॅमस्ट्रिंगचा सारख्या दुखापतीवर मात करून जेतेपद मिळवले आहे. पण यावेळी त्याला मैदानात उभे राहणं खरंच शक्य नाही, त्यामुळेच तो थांबलाय, असेही प्रतिस्पर्धी त्याच्याबद्दल म्हणाला आहे.
सर्वाधिक १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत मारलीये बाजी
नोव्हाक जोकोविच याने २४ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तो २५ व्या वेळी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न घेऊन कोर्टवर उतरला होता. पण दुखापतीमुळे त्याचे हे स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे.
- ऑस्ट्रेलियन ओपन- २००८, २०११, २०१२, २०१३,२०१५, २०१६,२०१९,२०२०,२०२१ आणि २०२३
- फ्रेंच ओपन- २०१६, २०२१ आणि २०२३
- विम्बल्डन - २०११, २०१४, २०१५, २०१८,२०१९,२०२१ आणि २०२२
- अमेरिकन ओपन- २०११, २०१५, २०१८ आणि २०२१