न्यूयॉर्क : अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचने सरळ सेट््समध्ये तर महिला विभागात नाओमी ओसाकाने युवा खेळाडूचे आव्हान परतवून लावत अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत शनिवारी चौथी फेरी गाठली.जोकोविचने जर्मनीच्या २८ व्या मानांकित जॉन-लेनार्ड स्ट्रफचा एक तास ४३ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-३, ६-३, ६-१ ने पराभव केला. येथे हा त्याचा २९ वा विजय ठरला तर यंदाच्या मोसमात २६ वा विजय आहे.
दोन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन ओसाकाला तिसऱ्या फेरीच्या लढतीत १८ वर्षीय मार्टा कोस्तयुकने आव्हान दिले. ओसाकाने अखेरचे पाच गेम जिंकत कोस्तयुकचा ६-३, ६-७, ६-२ ने पराभव केला. दुसरा सेट गमाविल्यानंतर ओसाका स्वत:वर नाराज असल्याचे दिसत होते.अमेरिकन चॅम्पियन अँजेलिक कर्बरही चौथी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. तिने २० वर्षीय अमेरिकन एन लीचा ६-३, ६-४ ने पराभव केला. २८ व्या मानांकित ब्राडीने कॅरोलिन गार्सियाचा ६-३, ६-३ ने पराभव केला. गार्सियाने अव्वल मानांकित प्लिस्कोव्हाचा पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदवला होता.
दोनवेळची विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्विटोव्हाने ६३ व्या मानांकित अमेरिकन खेळाडू जेसिक पेगुलाचा ६-४, ६-३ ने पराभव केला. पुरुष विभागात अलेक्सजेंडर ज्वेरव, डेव्हिड गोफिन, डेनिस शापोवालोव्ह, जॉर्डन थॉम्पसन आणि अलेजांद्रो डेविडोविच फोकिना यांनी चौथी फेरी गाठली. (वृत्तसंस्था)