Novak Djokovic out of Australian Open: नवीन वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनला सोमवारी सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचला समाविष्ट करून घेण्यात आले होते. पण आता मात्र जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. ऑस्ट्रेलियन न्यायालयात त्याने दाखल केलेल्या खटल्यात त्याच्या विरोधात निकाल लागल्यामुळे त्याला आता ऑस्ट्रेलियातून बाहेर जावं लागणार आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचचा सामना त्याचाच सहकारी मिओमीर केक्मानोविक याच्याशी होणार होता. सोमवारी संध्याकाळी हा सामना नियोजित होता. जोकोविच हा स्पर्धेचा गतविजेता होता. त्याच्या बाजूने निकाल लागला असता तरच त्याला ही स्पर्धा खेळता येणार होती. पण निकाल त्याच्या विरोधात लागल्याने आता त्याला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला मुकावे लागणार आहे. फेडरल कोर्टाने ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय कायम ठेवत जोकोविचला धक्का दिला.
कोर्टाने जोकोविचच्या विरोधात निर्णय दिल्याने आता त्याला ऑस्ट्रेलियातून बाहेर जावं लागणार आहे. तो जोपर्यंत ऑस्ट्रेलियात असेल तोपर्यंत त्याला मेलबर्नमध्ये नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियातून बाहेर जावं लागल्यास त्या व्यक्तीला पुढील तीन वर्षे ऑस्ट्रेलियात येता येत नाही. त्यामुळे हादेखील जोकोविचसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
काय आहे घटनाक्रम
जोकोविच १० दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मेलबर्नला पोहोचताच त्याला ताब्यात घेण्यात आले आणि चौकशी करण्यात आली. ऑस्ट्रेलियन सरकारने त्याचा व्हिसा रद्द केला. त्यावर त्याने मेलबर्न कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने त्याचा व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठी त्याचा समावेश करण्यात आला. पण अखेर इमिग्रेशन मंत्रालयाकडून ऑस्ट्रेलियन जनतेच्या हितार्थ जोकोविचचा व्हिसा पुन्हा एकदा रद्द करण्यात आला. फेडरल कोर्टाने त्याचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय़ कायम ठेवला. त्यामुळे आता त्याला ऑस्ट्रेलियातून बाहेर जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.