Novak Djokovic: स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने अपेक्षेप्रमाणे यूएस ओपनमधून माघार घेतली असल्याची माहिती एएफपीच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिली. COVID-19 लसीकरण केलेले नसल्याने त्याला युनायटेड स्टेट्समध्ये प्रवास करण्याची परवानगी नाही. त्यामुळे US Open 2022 मध्ये न खेळण्याचा निर्णय नोव्हाक जोकोविचने घेतल्याचे सांगितले जात आहे. जोकोविचने गुरुवारी ट्विटरवर वर्षातील शेवटच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतून माघार घेण्याची घोषणा केली. या स्पर्धेचा ड्रॉ उघड होण्याच्या काही तास आधीच त्याने चर्चांना पूर्णविराम दिला.
“अतिशय दु:खाने मला हे सांगावे लागत आहे की, मी या वेळी यूएस ओपनसाठी न्यूयॉर्कला जाऊ शकणार नाही”, असे जोकोविचने त्याच्या सहकारी खेळाडूंना शुभेच्छा देत लिहिले. आताच्या परिस्थितीकडे मी सकारात्मक पद्धतीने पाहीन आणि त्याच भावनेने कार्यरत राहीन. त्यामुळे मला पुन्हा स्पर्धेत उतरण्यासाठी प्रेरणादायी मिळेल आणि त्या संधीची मी वाट पाहीन", असेही जोकोविचने स्पष्ट केले.
कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याला सिनसिनाटी ओपनमधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. नोव्हाक जोकोविचने कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याला अमेरिकेला जाता येणार नाही आणि यामुळेच त्याला सिनसिनाटी ओपन (Cincinnati Open) या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. तसेच न्यूयॉर्कमध्ये २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अमेरिका ओपनलाही तो मुकणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चांवर अखेर आज पदडा पडला.
नोव्हाक जोकाविच कोरोनाची लस न घेतल्यामुळे यापूर्वी देखील वादात सापडला होता. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या आधी देखील कोरोनाची लस घेतली नव्हती, ज्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. जोकोविचने या सर्व प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांविरूद्ध खटलाही लढवला होता. पण त्याला अखेर स्पर्धेत सहभागी न होताच ऑस्ट्रेलियातून बाहेर पडावे लागले.
गतविजेता अलेक्झांडर झ्वेरेव्ह, गाएल मोंफिल्स, रिली ओपेल्का आणि डोमॅनिक थीम हे दिग्गज खेळाडू देखील दुखापतीमुळे सिनसिनाटी ओपन या स्पर्धेतून बाहेर आहेत. सेरेना विल्यम्स मात्र युएस ओपन खेळणार असून ही तिची कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असणार असल्याचे तिने आधीच स्पष्ट केले आहे.