Novak Djokovic Visa, Australian Open: टेनिसस्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन सरकारने धक्का दिला आहे. एखाद्या देशात लसीकरणाविना वास्तव्य करण्याचा व्यक्तीला मुलभूत अधिकार आहे असा युक्तिवाद जोकोव्हिचकडून करण्यात आला होता. परंतु याचविरोधात ऑस्ट्रेलियन सरकाने जोकोविचचा व्हिसा दुसऱ्यांदा रद्द केल्याची घटना घडली आहे. इमिग्रेशन मंत्री अलेक्स हॉक यांनी जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता जोकोव्हिचला लवकरात लवकर ऑस्ट्रेलिया सोडावं लागणार आहे. अशा परिस्थितीत जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला मुकावं लागण्याचीही शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाला जोकोव्हिच पुन्हा कायदेशीर आव्हान देऊ शकतो. त्याला एखाद्या देशात वास्तव्य करण्याचा अधिकार आहे असा युक्तीवाद त्याच्याकडून केला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळण्यासाठी तो देशात आला असून सोमवारपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता जोकोव्हिचला स्पर्धा खेळायला मिळणार की गतविजेता या स्पर्धेला मुकणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.