Novak Djokovic Hearing, Australian Open: सर्बियन टेनिसस्टार आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू नोव्हाक जोकोविच सध्या ऑस्ट्रेलियात विचित्रप्रकारे अडकला आहे. त्याने कोविड नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ऑस्ट्रेलियन सरकारने त्याचा व्हिसा रद्द केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ त्याच्यावर आली होती. पण जोकोविचने ऑस्ट्रेलियन न्यायव्यवस्थेकडे दाद मागितली असून त्याला काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे.
जोकोविचच्या ऑस्ट्रेलियातील अडचणी कमी होत नसल्या तरी त्याला ऑस्ट्रेलियन न्यायालयाने थोडा जास्त वेळ देशात राहण्याची परवानगी दिली आहे. जोकोविच सध्या इमिग्रेशन विभागाच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. तेथून तो मेलबर्न न्यायलयाच्या व्हर्च्युअल सुनावणीसाठी हजर झाला होता. जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळायला मिळावी आणि त्याचा व्हिसा मंजूर व्हावा यासाठी ही सुनावणी सुरू असतानाच, जोकोविचला आता किमान रात्री ८ वाजेपर्यंत ऑस्ट्रेलियात थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आज सुनावणी दरम्यान जोकोविचला मोठा दिलासा मिळाला. न्यायमूर्तींनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर जोकोविचचा ऑस्ट्रेलियातील वास्तव्याचा कालावधी थोडा वेळ वाढवण्यास मंजूरी दिली. ती मंजूरी मिळाली नसती तर त्याला सोमवारी सकाळीच ऑस्ट्रेलियातून बाहेर जावं लागलं असतं. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेचार वाजल्यापासून सुनावणीला सुरूवात झाली आहे. सुनावणीला सुरूवात होताच कोर्टाचे लाईव्ह स्ट्रीमिंग बंद झाल्याने काही काळ काम बंद झालं होतं. पण थोड्यावेळातच सारं काही पूर्ववत झालं आणि सुनावणी पुन्हा सुरू झाली.
या सुनावणी दरम्यान जर नोव्हाक जोकोविच दोषी आढळला तर त्याला पुन्हा एकदा पोलिस ताब्यात घेऊ शकतात. ऑस्ट्रेलियात पोहोचताच त्याला इमिग्रेशन विभागाच्या हॉटेलमध्ये बंद करण्यात आले होते.