ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. ५ : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत किताब जिंकला आहे. त्याने प्रतिस्पर्धी अँडी मरेचा ४ सेटमध्ये पराभव केला. ११ ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील विजेता जोकोविच प्रथमच फ्रेंच ओपनमध्ये चॅम्पियन ठरला आहे. त्याने मरेचा 3-6, 6-1, 6-2, 6-4 अश्या चार सेट पराभव केला.
जोकोविच सहा वेळेसचा ऑस्ट्रेलियन ओपन, तीन वेळेस विम्बल्डन आणि दोन वेळेस यूएस ओपनमध्ये विजेतेपद पटकावले आहे; परंतु फ्रेंच ओपनमध्ये त्याला २0११, २0१४ आणि २0१५ ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
गेल्या दोन वर्षांपासून नोव्हाक फायनलमध्ये पराभूत होत होता. 2012 सालीही त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र त्याने आपला कट्टर प्रतिस्पर्धी मरेचे आव्हान तीन तासांत संपुष्टात आणले.
जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेल्या अँडी मरेने उपांत्य सामन्यात गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाला ६-४, ६-२, ४-६, ६-२ असा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. पण फ्रेंच ओपनचे पहिले आणि कारकीर्दीतील तिसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचे मरेचे स्वप्न नोव्हाकच्या वेगवान खेळासमोर भंगले.