पॅरिस: सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने विश्वविक्रमी २३वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावताना नॉर्वेच्या कॅस्पर रुडला फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत सहज नमवले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात जोकोविचने रुडला पुनरागमनाची संधी दिली नाही.
रुडने पहिल्या सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेत जोकोला झुंजवण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र, यानंतर जोकोने आपला दर्जा दाखवून देताना सलग तीन गेम जिंकत बरोबरी साधली आणि नंतर पहिला सेट जिंकून आघाडीही घेतली. पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर पुढील दोन सेट सहज जिंकत जोकोने ७-६(७-१), ६-३, ७-५ अशा दमदार विजयासह तिसरे फ्रेंच जेतेपद पटकावले. यासह जोकोने स्पेनचा दिग्गज राफेल नदालला मागे टाकत सर्वाधिक २३ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विश्वविक्रमही नोंदवला.
सर्वात वयस्कर खेळाडू
जोकोविच फ्रेंच ओपन जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याचप्रमाणे, प्रत्येक ग्रँडस्लॅम स्पर्धा किमान तीन वेळा जिंकणारा जोकोविच पहिला टेनिसपटू ठरला. आपल्या कारकिर्दीत ३४व्यांदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी खेळताना जोकोविचने शानदार खेळ केला.