ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २३ - मुंबईकर अजिंक्य रहाणेचे दमदार शतक व मुरली विजयच्या अर्धशतकाच्या आधारे भारताने श्रीलंकेसमोर ४१३ धावांचे आव्हान ठेवले आहे. दुस-या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेने चौथ्या दिवसअखेर २ गडी गमावत ७२ धावा केल्या आहेत. श्रीलंकेला विजयासाठी ३४१ धावांची गरज असून भारताच्या विजयाच्या आशा आता गोलंदाजांवर अवलंबून आहेत.
कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु असून कालच्या १ बाद ७० धावसंख्येवरुन पुढे खेळताना अजिंक्य रहाणे व मुरली विजय या जोडीने भारताच्या डावाला आकार दिला. या जोडीने १४० धावांची भागीदारी केली. भारताच्या १४३ धावा झाल्या असताना मुरली विजय ८२ धावांवर पायचीत झाला. श्रीलंकेचा गोलंदाज थरिंडू कौशलने ही जोडी फोडली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही १० धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा ३४ धावांवर बाद झाला. अजिंक्य एकतर्फी किल्ला लढवत शतक ठोकले. रहाणे १२६ धावांवर बाद झाला. भारताने ८ गडी गमावत ३२५ धावा केल्या असताना कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित केला. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रसाद व थरिंडू कौशलने प्रत्येकी चार विकेट घेतल्या.
दुस-या डावात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेला लागोपाठ दोन धक्के देत भारतीय गोलंदाजांनी मॅचवरील पकड मजबूत केली आहे. सलामीवीर कौशल सिल्वा १ तर अखेरचा कसोटी सामना खेळणारा कुमार संगकारा १८ धावांवर बाद झाला. आर. अश्विनने या दोघांना माघारी पाठवले. पाचव्या व निर्णायक दिवशी श्रीलंकेच्या आठ फलंदाजांना माघारी पाठवण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे.