- प्रसाद लाडमुंबई : आतापर्यंत मी दोन आॅलिम्पिक पदके पटकावली आहेत; पण मला अजूनही सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. मी जर सातत्याने खेळत राहिलो तर आॅलिम्पिकमधील सुवर्णपदकही माझ्यासाठी दूर नाही. आता आयुष्यात आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय मी डोळ्यांपुढे ठेवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी करून मी आॅलिम्पिकच्या सरावाला श्रीगणेशा करेन, असे मत भारताला आॅलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून देणारा कुस्तीपटू सुशीलकुमारने सांगितले आहे. मुंबईत आयोजित एका खासगी कार्यक्रमासाठी तो आला असता त्याने ‘लोकमत’ला ही खास मुलाखत दिली.रिओ आॅलिम्पिक स्पर्धेला सुशीलला जाता आले नव्हते. त्याच्या ७४ किलो वजनी गटामध्ये भारतातून नरसिंग यादवची निवड केली होती. पण नरसिंग रिओमध्ये गेल्यावर उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता.आपल्या मुलाने जिंकायलाच हवे, असा जवळपास सर्वच पालकांचा अट्टहास असतो. त्यामुळे मुलांवर पालक विजयाचे दडपण लादत असतात. पण विजयापेक्षा माणूस पराभवातून जास्त शिकतो. पराभव हा माणसाला बरेच काही शिकवतो. त्यामुळे आयुष्यात पराभवाचे स्थान फार मोठे आहे. पराभव झाल्यावरतुम्ही स्वत:मधील कच्चे दुवे पाहता आणि ते सुधारण्यासाठी प्रयत्नकरता. पण जेव्हा तुम्ही जिंकत असता तेव्हा काही वेळा तुमचे पाय जमिनीवर नसतात. त्या वेळी आपले कच्चेदुवेही आपल्याला दिसत नाही.त्यामुळे खेळात सुधारणाही होत नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात पराभवाला मोठे स्थान आहे, असे सुशीलने सांगितले.पुनरागमन करणे सोपे नसतेकुस्तीसारख्या खेळात पुनरागमन करणे सोपे नसते. मी चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्तरावर पुनरागमन केले, हे करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. कारण कुस्तीमध्ये ताकद आणि मनोबल या दोन्ही महत्त्वाच्या ठरतात. या दोन्ही गोष्टींवर मेहनत घेऊन मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे, असे सुशील म्हणाला.मला फक्त कुस्तीच येतेमला आयुष्यात फक्त कुस्तीच येते. मी दुसरे काहीच करू शकत नाही. कुस्ती हा माझा श्वास आहे. त्यामुळेच मी चार वर्षांनी पुनरागमन करू शकलो. यापुढेही कुस्तीमध्येच काहीतरी करण्याचा माझा मानस आहे. सध्या एक कुस्तीपटू म्हणून मी खेळाला योगदान देत आहे, त्यानंतर युवा पिढीला घडवण्याचेही मी देशासाठी काम करेन, असे सुशीलकुमार म्हणाला.दोन आॅलिम्पिक पदकांचा मानकरी असलेला स्टार मल्ल सुशील कुमार आगामी आशियाडची तयारी जॉर्जियात करणार आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीत असलेला सुशील तेथे दहा दिवस कुस्तीचे धडे घेईल. इंडोनेशियाकडे रवाना होण्याआधी मात्र तो दिल्लीत दाखल होईल.