नवी दिल्ली : ‘ बॉक्सिंग फेडरेशनमध्ये काय चालले आहे याच्याशी आपले काही देणेघेणे नाही. राजकारणामुळे खेळाचे वाटोळे होते हे अनेकदा कळून चुकल्यानंतर मी आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्ण जिंकण्यासाठी सज्ज आहे.’ लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्य विजेती महिला बॉक्सर एम. सी. मेरिकोम हिने शुक्रवारी हा निर्धार व्यक्त केला.पाचवेळेची विश्व चॅम्पियन आणि गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण विजेती मेरिकोम म्हणाली,‘ माझी रुची फेडरेशनच्या राजकारणात नव्हे तर देशासाठी सुवर्ण जिंकण्यात आहे. पण तरीही देशातील युवा बॉक्सर्सना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळावी यासाठी बॉक्सिंग फेडरेशनचा वाद लवकरात लवकर निकाली निघावा अशी आपली इच्छा आहे.’भारतीय बॉक्सिंगमधील सर्वात अनुभवी असलेल्या मेरिकोमने भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढताना भाष्य केले. ती म्हणाली,‘हे प्रकरण लवकर निकाली काढण्यात यावे अशी वारंवार विनंती करीत आहे. मी बोलून थकले पण कुणीही ऐकायला तयार नाहीत. कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. आता फेडरेशनचे राजकारण कुठल्याही स्तरावर जावो, मी मात्र आॅलिम्पिक सुवर्णाकडे लक्ष्य केंद्रित करणार आहे.’ एका कार्यक्रमासाठी टेनिस स्टार महेश भूपतीसोबत असलेली मेरी म्हणाली,‘ मी भूपतीच्या कामावर फारच प्रभावित आहे. महेश मोठा खेळाडू आहे. मी माझ्या करियरमध्ये एक नव्हे तर अनेक खेळाडूंकडून प्रेरणा घेतली. यामुळेच प्रगती करत आले. आगामी स्पर्धांसह आलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्ण जिंकण्याचा आपला निर्धार असेल.’(वृत्तसंस्था)
आता लक्ष्य आॅलिम्पिक गोल्ड : मेरिकोम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 2:36 AM