शिलाँग : यजमान भारताची विक्रमी कामगिरी... नयनरम्य आतषबाजी... डोळे दीपवणारा लेझर शो आणि त्याला संगीताची मिळालेली जोड... अशा एक ना अनेक संस्मरणीय आठवणींसह मंगळवारी १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. केंद्रीय क्रीडामंत्री व सॅग स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष सर्बानंद सोनोवाल यांनी गर्दीने फुललेल्या इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियममध्ये स्पर्धेच्या समारोपाची घोषणा केली. समारोप समारंभाला आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई, आसाम व मेघालयाचे क्रीडामंत्री, पुढील सॅग स्पर्धेचे यजमान नेपाळ व बांगलादेशचे क्रीडामंत्री, भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन आणि महासचिव राजीव मेहता प्रामुख्याने उपस्थित होते. समारोप समारंभात खेळाडूंनी २०१९ मध्ये नेपाळमधील काठमांडूमध्ये होणाऱ्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा भेटण्याचा निर्धार करीत स्पर्धेचा निरोप घेतला. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई म्हणाले,‘‘ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरली. याचे सर्व श्रेय दोन्ही राज्य आसाम व मेघालय येथील अधिकारी व नागरिकांना जाते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या जास्तीत जास्त स्पर्धकांनी व अधिकाऱ्यांनी आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्यातर्फे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. यात काही त्रुटी आढळल्या असतील, तर त्यासाठी क्षमा मागतो. १२ दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेची ज्योत समारोपाची घोषणा झाल्यानंतर विझविण्यात आली. त्यानंतर स्टेडियमचा आसमंत आतषबाजीने उजळून निघाला. त्यानंतर आगामी स्पर्धेचे यमजान असलेल्या नेपाळने आपला छोटेखानी कार्यक्रम सादर केला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना मोहित केले. (वृत्तसंस्था)
आता भेट काठमांडूत
By admin | Published: February 17, 2016 2:39 AM