भारतासाठी कडू-गोड अनुभवांची शिदोरी देऊन यंदाचं पॅरिस ऑलिम्पिक संपलं. अनेक खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. काहींना यश मिळालं, काहींना यशानं हुलकावणी दिली. पण, खेळाडूंपासून ते प्रत्येक भारतीय नागरिकाला या ऑलिम्पिकने अनेक धडे दिले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने दोन कांस्य पदके पटकावून यंदा बहारदार कामगिरी केली. तिच्या आवडत्या २५ मीटर प्रकारात तिला यशाने चकवा दिला. नीरज चोप्रा याचे सुवर्ण हुकले. तरीही दोघांचीही ब्रॅण्ड व्हॅल्यू मात्र वाढली आहे. जाहिरातीच्या क्षेत्रात या दोघांसाठी कंपन्यांनी पायघड्या पसरल्या आहेत. कंपन्यांनी या दोघांनाही अधिक पैसे देऊ केले आहेत आणि त्यांनी आपल्याकडेच जाहिराती कराव्यात यासाठी त्यांची मनधरणी सुरू केली आहे.
मनू भाकर हिलाही देशातील अत्यंत बड्या जाहिरात ब्रॅण्ड्सनी आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न चालवला आहे. आधी ज्या जाहिरातींमध्ये ती काम करत होती, त्यापेक्षा किती तरी जास्त रकमेची ऑफरही तिला दिली जात आहे. मनू भाकरकडे आतापर्यंत जवळपास शंभर ब्रॅण्ड्सनी आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी संपर्क साधला आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. तिच्या ऑफर रकमेतही त्यांनी स्वत:हून आठ ते दहा पटींनी वाढ केली आहे. त्यातून कोणत्या जाहिराती, कोणते ब्रॅण्ड्स स्वीकारावेत असा प्रश्न मनू भाकर आणि तिच्या टीमला पडला आहे. ऑलिम्पिकपूर्वी ज्या जाहिरातींसाठी मनू भाकरला वीस ते पंचवीस लाख रुपये मिळत होते, त्याच जाहिरातींसाठी तिला दोन कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची ऑफर दिली जात आहे.
मनू भाकर पॅरिसमध्ये असताना आणि तिनं पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर लगेचंच विविध ब्रॅण्ड्सनी तिच्याकडे जाहिरातीसाठी लकडा लावला होता. दुसरं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर त्यात आणखीच वाढ झाली आणि जणू काही तिच्याकडे त्यासाठी रीघच लागली. मनू भाकर तिसरंही ऑलिम्पिक जिंकेल असा अंदाज बांधून काही बड्या ब्रॅण्ड्सनी तर खूपच मोठ्या रकमेची ऑफर तिला देऊ केली होती. दुर्दैवानं तिचं तिसरं पदक हुकलं. पण, तरीही जाहिरात कंपन्यांची तिच्यामागची रीघ काही कमी झाली नाही. मनू भाकर भारतात परतल्यानंतर तर तिच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आणि तिला आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी करारबद्ध करण्यासाठी तिचं मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनू भाकरच्या मॅनेजमेंट कंपनीचं म्हणणं आहे, मनू भाकरला करारबद्ध करण्यासाठी कंपन्यांचे एकामागून एक प्रस्ताव येणे सुरूच आहे. त्यात ई-कॉमर्स कंपन्यांपासून ते स्किन केअरपर्यंतच्या अनेक कंपन्या आहेत. कोणाला हो म्हणावं आणि कोणाला नाही, हा आम्हा सर्वांपुढचाच मोठा प्रश्न आहे. कारण काही ठराविक जाहिरातीच स्वीकाराव्यात असं मनू भाकरचंही म्हणणं आहे. तरीही त्यातल्या त्यात चांगल्या कंपन्या आणि दीर्घकालीन कराराचा आम्ही विचार करणार आहोत.
मनू भाकरचंही म्हणणं आहे. पैसा आणि प्रसिद्धीची मी कधीच भुकेली नव्हती आणि नाही. पॅरिस ऑलिम्पिकनंतर मला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. जाहिरातींसाठीही अनेक मोठमोठ्या ऑफर्स येत आहेत. एवढी प्रसिद्धी आणि पैसा मी कशी सांभाळू शकेन? त्याविषयी मला फारसं काही कळतही नाही आणि त्यामागे मला जायचंही नाही. मला माझ्या खेळावर फोकस करायचा आहे. जाहिराती, पैसा नाही मिळाला तरी चालेल, पण देशासाठी पदक आणणं हे माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे. देवानं आपल्याला जे दिलं आहे आणि जे देत आहे त्यावर आपण खुश राहायला हवं. आपल्याकडे जे आहे, त्यातून इतरांनाही मदत करण्याचा प्रयत्न करायला हवा. माझ्या परीनं मी त्यासाठी प्रयत्न करते. ऑलिम्पिकची दोन पदकं मिळालीत, म्हणून माझ्या दिनचर्येत फारसा फरक पडणार नाही. नेमबाजी हे माझं पहिलं ध्येय, पहिलं प्रेम आणि पहिलं आकर्षण आहे. नेमबाजीनंच मला आजवर सर्वस्व दिलं आहे. माझं आयुष्यही त्यासाठीच असेल..मनूनं आजवर अनेक चढउतार पाहिले. अनेक अडचणींना तिला सामोरं जावं लागलं. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पण, जिद्दीनं त्या साऱ्यांवर तिनं मात केली..
मला खायचंय आणि झोपायचंय! पॅरिस ऑलिम्पिकहून भारतात परतल्यानंतर मनूचं जोरदार स्वागत झालं. लगेचंच नेमबाजीच्या सरावाला आणि पुढच्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचंही तिनं सांगितलं. पण, निदान सुरुवातीला तरी आपण भारतीय खाद्यपदार्थांवर ताव मारणार असल्याचं तिनं सांगितलं. मनू म्हणते, भारतीय खाद्यपदार्थ केव्हा आणि कधी खायला मिळतील असं मला झालं आहे, मला झोपही काढायची आहे. पण, माझे प्रशिक्षक जसपाल राणा सर यातलं मला काय आणि किती करू देतील हाच प्रश्न आहे !