बर्लिन : ज्युनिअर गटात नुकतेच जगज्जेतेपद पटकाविल्यानंतर दोन महिन्यांहून कमी कालावधीत साताऱ्याची १७ वर्षीय अदिती गोपीचंद स्वामी आणि नागपूरचा युवा तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे यांनी विश्व तिरंदाजी स्पर्धेच्या महिला तसेच पुरूष कंपाउंड प्रकारात शनिवारी विश्वविजेता होण्याचा मान मिळविला.
महिलांच्या अंतिम फेरीत किशोरवयीन अदितीने मेक्सिकोच्या एंड्रिया बेसेरा हिला पराभूत करत जगज्जेतेपद पटकावले. जुलैमध्ये लिमरिक येथे युवा अजिंक्यपद स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले होते. तिने या अंतिम फेरीत १५० पैकी १४९ गुणांची कमाई केली. शांत चित्त ओजसने परफेक्ट १५० गुणांसह अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत पोलंडच्या लुकासवर एका गुणाने सरशी साधली.
ओजसच्या सुवर्णासह भारताने विश्व स्पर्धेत प्रथमच तीन सुवर्ण आणि एक कांस्य अशी चार पदके जिंकली आहेत. ओजसचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे तिसरे सुवर्ण ठरले. ऑलिम्पिक प्रकार असलेल्या रिकर्व्हमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना रिकाम्या हाताने परतावे लागले. विश्वविजेते अदिती आणि प्रवीण हे सातारा येथील प्रवीण सावंत यांच्या दृष्टी आर्चरी अकादमीत सराव करतात. नागपूर जिल्हा आर्चरी संघटनेचे सचिव संजय कहुरके यांनी ओजसच्या कामगिरीचे अभिनंदन केले.
एंड्रियाला अंतिम फेरीत सहाव्या मानांकित अदितीकडून तगडे आव्हान मिळाले. अदितीने तीन बाणांनी अचूक लक्ष्य साधत पहिल्या फेरीत ३०-२९ अशी आघाडी घेतली. अदितीने लय कायम राखताना पुढील तिन्ही फेऱ्यांमध्ये तीन गुणांची आघाडी घेतली. शेवटच्या फेरीत एक लक्ष्य साधताना नऊ गुण मिळवले. उर्वरित लक्ष्य साधताना तिने १०-१० गुण वसूल केले. अदितीने १४९ गुण मिळवले, तर एंड्रिया १४७ गुणांवर राहिली.
अदितीचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्ण आहे. अदितीने परनीत काैर आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या साथीत शुक्रवारी कंपाउंड महिला सांघिक गटात पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले.