Neeraj Chopra sets a new National Record : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने 10 महिन्यानंतर झोकात पुनरागमन केले. फिनलँड येथे सुरू असलेल्या Paavo Nurmi Games स्पर्धेतून तो प्रथमच मैदानावर उतरला अन् कमाल करून गेला. नीरज चोप्रानं टोक्योत भालाफेकीत ८७.५८ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम नीरजनं केला. २००८नंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक नीरजमुळे मिळाले. २००८मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रानं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकनंतर त्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नीरजने Paavo Nurmi Gamesमध्ये पहिल्या प्रयत्नात 86.92 मीटर लांब भालाफेक केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 89.30 मीटर थ्रो केला. या स्पर्धेत फिनलँडच्या 25 वर्षीय ऑलिव्हर हेलँडरने 89.93 मीटर भालाफेकीसह सुवर्णपदक जिंकले. नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पण, त्याने राष्ट्रीय विक्रम नोंदवला. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 88.07 मीटर होता आणि तो नीरजनेच केला होता. हा विक्रम त्याने मागील वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे नोंदवला होता.