आजपासून सुरू होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं ११७ क्रीडापटूंचं पथक सज्ज झालं आहे. हॉकीसह, नेमबाजी, कुस्ती, तिरंदाजी यासह इतर खेळांमध्ये पदकांवर मोहोर उमटवण्याचा या खेळाडूंचा प्रयत्न असेल. दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या पथकामध्ये एका महिला आमदाराचाही समावेश आहे. त्या नेमबाजीच्या शॉटगन ट्रॅप प्रकारामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या महिला आमदारांचं नाव आहे श्रेयसी सिंह. बिहारमधील जमुई विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेयसी सिंह या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या असून, ३० आणि ३१ जुलै रोजी होणाऱ्या नेमबाजीच्या शॉटगन ट्रॅप इव्हेंटमध्ये त्या पदकावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करतील.
श्रेयसी सिंह ह्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या लोकप्रतिनिधी असल्याचं बोललं जात आहेत. याआधी श्रेयसी सिंह यांनी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. तर २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. तर त्याच वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक डबल ट्रॅप प्रकारामध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. तर २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदक जिंकलं होतं. २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या श्रेयसी सिंह यांनी २०२० मध्ये झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जमुई मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्या विजयी होऊन आमदार बनल्या होत्या. जमुई जिल्ह्यातील गिद्धौर येथील रहिवासी असलेल्या श्रेयसी सिंह ह्या माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह आणि बांकाच्या माजी खासदार पुतुल कुमारी यांच्या कन्या आहेत. दरम्यान, राजकारणात प्रवेश केल्यानंतरही श्रेयसी सिंह यांनी खेळामधील आपली आवड जपली. तसेच त्या आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरल्या आहेत.