नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकसाठी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ पात्र ठरले असले, तरीही त्यांचे या प्रतिष्ठित स्पर्धेत पदक जिंकण्याचे फक्त स्वप्नच ठरू शकते, असे मत १९५६च्या आॅलिम्पिक सुवर्णविजेत्या भारतीय संघाचे सदस्य आर. एस. भोला यांनी व्यक्त केले.भारतीय महिला हॉकी संघाने ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. गेल्या वर्षी बेल्जियममध्ये झालेल्या हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्ये या संघाने पाचवे स्थान मिळवले होते. युरो हॉकी चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंड आणि हॉलंड संघ फायनलमध्ये पोहोचताच भारतीय संघाचा रियोसाठीचा मार्ग सुकर झाला. भारतीय महिला हॉकी संघाने याआधी १९८० मॉस्को आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. याशिवाय, पुरुष हॉकी संघानेदेखील गेल्या वर्षी इंचियोन येथील आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते आणि त्यामुळे पुरुष संघ आधीच आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. या यशामुळे अनेक जणांमध्ये हॉकीत पुन्हा सुवर्ण दिवस परतण्याची आशा उंचावली आहे. तथापि, १९५६मध्ये सुवर्ण आणि १९६०मध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या संघाचे सदस्य भोला यांनी म्हटले, ‘‘ज्या संघातील खेळाडूंचा जबरदस्त फिटनेस आणि त्याचबरोबर चांगले कौशल्य, व्यूहरचना आणि नियोजनाबरोबरच मानसिकरीत्या मजबूत आहे, असेच संघ आधुनिक हॉकीत यशस्वी ठरत आहेत; परंतु या सर्व बाबींत आमच्या संघात कमतरता आहे.’’त्यांनी जुन्या काळातील खेळाडूंचे स्मरण करताना म्हटले, ‘‘सर्वच जण भारतीय संघ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकेल असे म्हणत आहेत; परंतु माझा प्रश्न की कसे जिंकेल? ध्यानचंद चंद्राच्या प्रकाशातही सराव करीत होते आणि सगळेच खेळाडूही कठोर मेहनत घेत होते; परंतु मला विद्यमान संघातील कोणत्या एका खेळाडूचे नाव सांगा, ज्यात खेळाविषयी या मर्यादेपर्यंत जिद्द आणि त्यात झोकून देण्याची वृत्ती आहे.’’१९७६च्या आॅलिम्पिक संघाचे व्यवस्थापक असलेले भोला म्हणाले, ‘‘खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यावर विशेष मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर, सामन्याच्या निर्णायक क्षणी थंड पडण्याच्या सवयीत सुधारणा करण्याची गरज आहे.’’ (वृत्तसंस्था)
आॅलिम्पिकमधील हॉकी पदक स्वप्नच : भोला
By admin | Published: August 31, 2015 11:53 PM