Manu Bhaker on Marriage Plans: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताने सहा पदके जिंकली. यात नेमबाज मनू भाकर हिने दोन कांस्य पदके जिंकली. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. भारतात परतल्यावर तिचे जंगी स्वागत झाले. तसेच अनेक ब्रँड्सने तिला जाहिरातींच्या ऑफर्स दिल्या. या प्रसिद्धीसोबतच आता तिच्या लव्ह लाइफची आणि लग्नाचीही चर्चा रंगल्याचे दिसून आले. मनू भाकर रविवारी तिच्या गावी गोरिया, झज्जर येथील गोकुलधाम गोशाळेत पोहोचली. यावेळी मीडियाशी बोलताना मनू भाकरने काही प्रश्नांची उत्तरे दिली.
लग्नाच्या प्रश्नावर मनूचे उत्तर
मनू भाकर बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार का? या चर्चांना तिनेच पूर्णविराम दिला. बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या प्रश्नावर मनू म्हणाली की, मला माझा खेळ खूप आवडतो आणि नंतर मी कोचिंगही करेन. याशिवाय लग्नाबाबतचाही प्रश्न मनूला विचारण्यात आला. प्रश्न ऐकताच आधी ती लाजली, मग लाजली आणि मग मनूने लाजून उत्तर दिले. "या सगळ्यात लग्नाचा प्रश्न कुठून आला... अद्याप याबाबत मी काहीही विचार केलेला नाही. देवाने जे ठरवले असेल तर ते भविष्यात वेळच्या वेळी घडेल. सध्या मी माझ्या करियरवरच लक्ष्य केंद्रित करायचे ठरवले आहे," असे तिने हसतमुखाने उत्तर दिले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहण्याच्या प्रश्नावर मनू म्हणाली की, प्रत्येकजण केवळ सुवर्णपदकासाठीच खेळतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकण्याची आशा होती. कांस्यपदक सुवर्णपदक जिंकण्यासाठी आणखी प्रेरणा देईल. तीन महिने खेळातून ब्रेक घेऊन पुन्हा तयारीला लागणार, असेही तिने सांगितले.