भारतात कुस्तीचा आखाडा मैदानाबाहेर सुरू असल्याचे चित्र दिसतेय... महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखवर अन्याय झाल्यावरून वाद सुरू असताना आता दिल्लीतील जंतर मंतरवर ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत. ऑलिम्पिकमध्ये देशाची शान उंचावणाऱ्या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दंड थोपटले आहेत. दिल्लीच्या जंतर-मंतरवर अनेक कुस्तीपटू कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचा निषेध करत आहेत. यामध्ये ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि सरिता मोर या कुस्तीपटूंचा समावेश आहे.
कुस्तीपटूंनी त्यांच्या तक्रारी किंवा मागण्या सविस्तरपणे सांगितल्या नाहीत. पण ते डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष आणि कैसरगंजचे भाजप खासदार सिंग यांच्या वृत्तीला कंटाळले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. ट्विटरवर डब्ल्यूएफआय प्रेसिडेंटचा बहिष्कार करण्याचा ट्रेंड खेळाडूंनी सुरू केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पीएमओ यांनाही टॅग केले आहे. बजरंग, विनेशसह रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंद्र किन्हा आणि राष्ट्रकुल पदक विजेता सुमित मलिक हे जंतरमंतरवर धरणे धरणाऱ्या ३० कुस्तीपटूंमध्ये आहेत.
विनेश फोगटनेही ट्विट करून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तिने लिहिले, 'खेळाडूला स्वाभिमान हवा असतो आणि तो ऑलिम्पिक आणि मोठ्या खेळांसाठी पूर्ण तीव्रतेने तयारी करतो. पण, महासंघानेच त्यांना साथ दिली नाही तर त्यांचे मनोधैर्य खचते. पण, आम्ही झुकणार नाही. आपल्या हक्कांसाठी आणि हक्कांसाठी लढणार आहोत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"