Manu Bhaker Ramp Walk Video : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर... ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीसह मनू प्रसिद्धीच्या झोतात आली. तेव्हापासून तिने अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. कधी नृत्य तर कधी पदकांसोबत फोटोशूट करुन ती चाहत्यांपर्यंत पोहोचायची. सतत पदक घेऊन वावरल्यामुळे तिला ट्रोल देखील करण्यात आले. मात्र, मनूने टीकाकारांना देशभक्ती सांगत चोख प्रत्युत्तर दिले. आता तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मनूने लॅकमे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला.
मनू भाकरने २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदके जिंकून इतिहास रचला. मनूचा जन्म हरयाणातील झज्जर जिल्ह्यात झाला. तिने तरुण वयापासून शूटिंगमध्ये करिअर घडवण्यासाठी पावले उचलली. वयाच्या चौदाव्या वर्षी तिने आपले करिअर म्हणून नेमबाजीची निवड केली आणि तिच्या वडिलांनी या प्रवासात चांगली साथ दिली.
मनू भाकरची ऑलिम्पिक २०२४ मधील कामगिरी
२८ जुलै, रविवार : या दिवशी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनूने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. ३० जुलै, मंगळवार : मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.३ ऑगस्ट, शनिवार : २५ मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनू भाकरने पदकाची हॅटट्रिक मारली. तिने शुक्रवारी ५९० गुणांसह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनूला अपयश आल्याने पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.