अम्मान : ज्युनियर गटाची माजी विश्वविजेती मुष्टीयोद्धा साक्षी चौधरीने ५७ किलो गटाच्या आशियाई ऑलिम्पिक पात्रतेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. अन्य लढतीत सिमरनजीत कौरने ६० किलो गटातून आगेकूच केली. बुधवारी साक्षीने आशियाई रौप्य विजेती तसेच चौथी मानांकित थायलंडची निलावन टेकसूएप हिच्यावर ४-१ ने मात केली. दोनवेळा युवा विश्वविजेत्यी राहिलेल्या १९ वर्षांच्या साक्षीला उपांत्यपूर्व सामन्यात कोरियाची इम एड्जी हिच्याविरुद्ध ९ मार्च रोजी खेळावे लागेल. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारे बॉक्सर टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत.सुरुवातीला साक्षीने वर्चस्व गाजवले, मात्र टेकसूएपने दुसऱ्या फेरीत मुसंडी मारली. यामुळे साक्षी दडपणाखाली आली. पण अखेरच्या ३ मिनिटांत आक्रमक खेळ करत साक्षीने प्रतिस्पर्धी खेळाडूला सावरण्याचीही संधी दिली नाही.दुसरीकडे जागतिक कांस्य विजेती सिमरनजीतने कझाखस्तानच्या रिम्मा वोलोसेंको हिला ५-० असे लोळवले. सिमरनजीत पुढील सामन्यात मंगोलियाच्या नुमुन मोंखोरविरुद्ध लढेल. (वृत्तसंस्था)
ऑलिम्पिक पात्रता मुष्टियुद्ध, साक्षी चौधरी उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 3:42 AM