दिल्ली : पुण्याचा मल्ल राहुल आवारे याने संदीप तोमर याला नमवित आॅलिम्पिक पात्रता फेरीतील आपला प्रवेश निश्चित करीत, रियो आॅलिम्पिकच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. सर्वाधिक चर्चेच्या कुस्तीत आॅलिम्पिक पदकविजेत्या योगेश्वर दत्तने अमित धनकड याला नमविले. दिल्लीमध्ये आॅलिम्पिक पात्रता फेरीसाठी निवड चाचणी झाली. त्यात शेवटपर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत राहुलने ५७ किलो गटात बाजी मारत पात्रता फेरीत प्रवेश निश्चित केला. राहुलने सुरुवातीस आक्रमक भूमिका घेत संदीप तोमर याच्यावर दबाव निर्माण केला. टांग व बगल मारीत आघाडी घेतली. शेवटचा काही वेळ शिल्लक असताना राहुल ९-४ असा आघाडीवर होता. मात्र, शेवटच्या काही क्षणात संदीपने बगल मारत चार गुण वसूल केले. मात्र, अखेरीस राहुलने हा सामना ९-८ असा जिंकला, अशी माहिती प्रशिक्षक काका पवार यांनी दिली. आॅलिम्पिक पात्रता फेरीसाठी भारतीय पथकात योगेश्वर स्थान मिळविणार की अमित, याबाबत कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता होती. मात्र, आॅलिम्पिक कांस्यविजेत्या व महाबली सतपाल यांचा शिष्य असलेल्या योगेश्वरने बाजी मारली. योगेश्वर व अमित यांच्यात निवड प्रक्रियेवरून बराच वाद झाला होता. ग्लास्गो क्रीडा स्पर्धा-२०१४साठी कुस्ती महासंघाने निवड चाचणी स्पर्धा न घेताच, योगेश्वरची निवड केल्याचा आरोप अमितने केला होता. त्यावरून दिल्ली उच्च न्यायालयातही अमितने याचिका दाखल केली होती. त्यामुळे या दोघांची कुस्ती पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली होती. योगेश्वरने पहिल्या फेरीपासूनच अमितवर वर्चस्व ठेवले. सुरुवातीस ४-२ अशी आघाडी घेत अमितवर दबाव निर्माण केला. त्यानंतर आवडत्या फित्ले डावावर अमितवर ७-२ अशी मात केली. अन्य लढतीत ८६ किलो गटात सोमवीर याने गोपाल यादव याला पराभूत केले. कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे १८ ते २० मार्च दरम्यान होणाऱ्या पात्रता फेरीसाठी भारताचे अकरा सदस्यीय पथक जाणार आहे. यातील ५ कुस्तीपटू फ्री स्टाइल, तर सहा कुस्तीपटू ग्रीको रोमन प्रकारात सहभागी होणार आहेत.
राहुल आवारेने मिळवले आॅलिम्पिक पात्रता फेरीचे तिकीट
By admin | Published: March 06, 2016 3:06 AM