नवी दिल्ली : दोन वेळचा आॅलिम्पियन संजीव राजपूतने आशियाई आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुष गटात ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये चौथे स्थान पटकाविले. याबरोबरच त्याने आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा प्राप्त केला. भारतासाठी हा १२ वा असा विक्रमी कोटा ठरला. राजपूतच्या या कामगिरीनंतर क्रीडासंग्रामात आता भारताचे आतापर्यंतचे सर्वाधिक नेमबाज सहभागी होणार आहेत. चार वर्षांपूर्वी लंडन येथे भारताने ११ नेमबाजांची टीम पाठविली होती. डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये २४९.५ गुण मिळवत राजपूतने देशासाठी कोट प्राप्त केला. त्याने ११६३ या स्कोअरसह चौथा क्रमांक मिळवत फायनलसाठी पात्रता मिळवली होती. या स्पर्धेत तीन कोटा स्थान उपलब्ध होते. त्यातील एक कझाकिस्तानच्या विताली डोवगन आणि थायलंडच्या नापिस तोर्तुगपानिचने प्राप्त केला. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रानिंदर सिंह यांनी भारताच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्ही यंदा चांगली कामगिरी करू शकलो. १२ नेमबाज आता आॅलिम्पिकसाठी जातील, ही बाब अभिमानास्पद आहे. आता खेळाडूंच्या तयारीसाठी प्रशिक्षणावर विशेष लक्ष द्यावे लागेल.(वृत्तसंस्था)
राजपूतने मिळवला आॅलिम्पिक कोटा
By admin | Published: February 03, 2016 3:09 AM