Olympics 2028 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप शानदार क्लोजिंग सेरेमनीने झाला. जवळपास २ आठवडे हे ऑलिम्पिक खेळ चालले. आता क्रीडाप्रेमींच्या नजरा पुढील ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. पुढील ऑलिम्पिक २०२८ मध्ये होणार आहे. पुढे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पाच नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तीन खेळांचे पुनरागमन होत असून दोन खेळांमध्ये पदार्पण होणार आहे. त्यामुळं पुढील ऑलिम्पिक कुठं आणि केव्हा सुरू होणार आहे. तसंच, ऑलिम्पिकमध्ये सामील होणारे नवीन पाच खेळ कोणते आहेत? हे जाणून घ्या.
पुढील ऑलिम्पिकचे आयोजन कधी आणि कुठं होणार?पॅरिस ऑलिम्पिकनंतर पुढील ऑलिम्पिक अमेरिकेत होणार आहे. २०१८ मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात ऑलिम्पिकचे आयोजन केलं जाणार आहे. लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ ची ओपनिंग सेरेमनी १४ जुलै २०२८ रोजी प्रस्तावित आहे. तर या ऑलिम्पिकची क्लोजिंग सेरेमनी ३० जुलै २०२८ रोजी प्रस्तावित आहे.
पाच नवीन खेळ कोणते?लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ मधून ब्रेकिंगचा खेळ हटवण्यात आला आहे. हा नवीन खेळ होता, जो पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये होता. दरम्यान, लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ मध्ये पाच नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ही क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. या पाच नवीन खेळांमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लाक्रोस (सिक्सेस), स्क्वॅश आणि टी-२० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
आयओसीचे अध्यक्ष काय म्हणाले?आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी सांगितलं की, "या पाच नवीन खेळांची निवड अमेरिकन क्रीडा संस्कृतीशी सुसंगत आहे. यामुळं लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ एक वेगळं असेल. तसंच, या नवीन खेळांच्या समावेशामुळं ऑलिम्पिक चळवळीला खेळाडू आणि चाहत्यांच्या नवीन समुदायांशी जोडण्याची अनोखी संधी मिळेल."
नवीन खेळांचा ऑलिम्पिक इतिहासलॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ ही क्रिकेटसाठी महत्त्वाची संधी आहे, कारण पॅरिस ऑलिम्पिक १९०० नंतर क्रिकेट पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये परतणार आहे. क्रिकेट व्यतिरिक्त टोकियो २०२० मध्ये खेळल्या गेलेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल देखील परत येत आहेत. १९०४ आणि १९०८ मध्ये ऑलिम्पिकचा भाग असलेला लॅक्रोस ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. फ्लॅग फुटबॉल आणि स्क्वॅश, जे अमेरिकन क्रीडा संस्कृतीचे महत्त्वाचे भाग आहेत. ते २०२८ मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करतील.