पॅरिस : ऑलिम्पिक आयोजनस्थळी आणि खेळाडूंचे निवास असलेल्या क्रीडाग्राममध्ये उंदरांसह इतर कीटकांचा त्रास होत आहे. उंदीर पकडून त्यांना इतरत्र सोडण्यासाठी आयोजन समिती कामाला लागली आहे.
आयोजन समितीने उंदरांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सांडपाण्याचा योग्य निचरा, गटारींची सफाई आणि उघड्यावरील अन्नाची योग्य विल्हेवाट ही मोहीम हाती घेतली. याच गटारातून मोठमोठे उंदीर बाहेर पडतात, असे लक्षात आले आहे. जेथे भरपूर प्रमाणात उंदीर आहेत, तेथे त्यांना जाळ्यात अडकविले जात आहे.
शाकाहारी जेवण२०६ देशांतील १०,७१४ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दिसणार आहेत. स्पर्धेवर फ्रान्स सरकारने खूप खर्च केला. स्पर्धेतील स्पर्धकांसाठी फक्त शाकाहारी जेवण ठेवण्यात आले आहे. क्रीडाग्राममधील जेवण हे साधे असेल, मांस व दुग्धजन्य पदार्थ नसतील. बहुतांश फळे आणि भाज्या दिल्या जातील. अॅथलिट्सना सिंथेटिक मांस दिले जाणार असल्याची माहिती मिळाली. क्रीडाग्राममध्ये कुठलीही घाण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोरोनाचा शिरकावऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला वॉटर पोलो संघातील पाच खेळाडूंना कोव्हिडची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पॅरिसमध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रमुख अॅना मियर्स यांनी सांगितले की, 'कोव्हिडचे हे प्रकरण केवळ वॉटर पोलो संघापुरतेच मर्यादित आहे.' कोव्हिड बाधित खेळाडूंना सराव करण्याची परवानगी आहे.