नवी दिल्ली : आगामी आॅलिम्पिक स्पर्धेआधी होणारी चॅम्पियन ट्रॉफी आणि सहा देशांची स्पर्धा आव्हानात्मक असून भारतीय संघासाठी ही स्पर्धा मानसिक तयारीसाठी उत्तम स्पर्धा ठरेल, असे वक्तव्य भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने केले. रविवारी चॅम्पियन्स स्पर्धेसाठी लंडनला रवाना होण्यापूर्वी श्रीजेशने आपली प्रतिक्रिया दिली.अनुभवी सरदार सिंगच्या अनुपस्थितीत गोलरक्षक श्रीजेशकडे टीम इंडियाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. श्रीजेशने सांगितले, ‘‘आम्ही येथून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लंडनला रवाना होणार आहोत. त्यानंतर सहा देशांचा समावेश असलेल्या आव्हानात्मक मालिकेसाठी स्पेनला जाऊ. रिओ आॅलिम्पिकसाठीही याच प्रकारचा कार्यक्रम असेल.’’ त्याचप्रमाणे, ‘‘जवळपास एक महिन्याचा हा दौरा आमच्यासाठी मानसिक परीक्षेचा ठरेल. कारण, लंडनमध्ये आम्हाला जगातील अव्वल चार संघांविरुद्ध आणि स्पेनमध्ये पाच संघांविरुद्ध खेळायचे आहे. याच संघांविरुद्ध रिओ आॅलिम्पिकमध्येही सामना होणार असल्याने दोन्ही स्पर्धा महत्त्वाच्या ठरणार आहेत,’’ असेही श्रीजेशने सांगितले. (वृत्तसंस्था)आम्हाला एक आठवड्याचा वेळ मिळेल आणि त्यानंतर आयुष्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी करोडो लोकांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही खेळू. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढेल व सकारात्मक खेळ करण्यास मदत मिळेल. कर्णधार म्हणून खेळाडूंमध्ये जोश कायम राखणे महत्त्वाचे आहे. संघातील प्रत्येक खेळाडूवर एक विशिष्ट जबाबदारी आहे आणि पूर्ण दौऱ्यात कामगिरीत सातत्य राखणे प्रमुख लक्ष्य आहे.- पी. आर. श्रीजेश लंडन आॅलिम्पिकपूर्वी आम्ही युरोपमध्ये होतो आणि त्यानंतर थेट आॅलिम्पिक खेळण्यास पोहोचलो. या वेळी मात्र खेळाडूंनी कोच रोलेंट ओल्टमेंस यांना न्यूझीलंड दौऱ्यानंतरच काहीतरी वेगळे करण्यास सांगितले होते. सलग सामन्यांमुळे आम्हाला थकवा येणार नाही आणि टुर्नामेंटआधी आम्हाला तंदुरुस्त होण्यास वेळही मिळेल. यामुळे आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून चुकांना सुधारून पूर्णपणे सज्ज राहू, असेही श्रीजेशने सांगितले.
आॅलिम्पिकपूर्वी दोन स्पर्धा मानसिक तयारी ठरणार
By admin | Published: June 06, 2016 2:25 AM