जिनेव्हा : टोकियो ऑलिम्पिकला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असला तरी आयोजन रद्द होणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने गुरुवारी स्पष्ट केले. आयओसीच्या वार्षिक बैठकीनंतर बुधवारी पत्रपरिषद बोलविण्यात आली होती, मात्र निदर्शकांनी व्हर्च्युअल पत्रपरिषदेत अडथळा आणला.कोरोनामुळे टोकियोसह जपानच्या अनेक शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीतील ऑलिम्पिकचे आयोजन रद्द व्हावे, अशी अनेकांची मागणी आहे.आयओसी प्रवक्ते मार्क ॲडम्स म्हणाले, ‘आम्ही लोकांचे मत जाणून घेऊ शकतो, मात्र त्याआधारे निर्णय होणार नाही. स्पर्धा होतीलच!’ ॲडम्स हे आयओसी प्रमुख थॉमस बाक यांचे प्रतिनिधी म्हणून येथे आले आहेत. बाक यांचा दौरा कोरोनामुळे रद्द करण्यात आला. अखेरचा प्रश्न विचारण्याआधीच एका निदर्शकाने ऑलिम्पिक होणार नाहीत, असा धमकीवजा संदेश दिल्याने पत्रपरिषद गुंडाळण्यात आली. ॲडम्स यांनी या अडथळ्यांकडे दुर्लक्ष केले. ते म्हणाले,‘बाक येथे असते तर हा स्टंट आणखी रोमांचक ठरला असता.’
आयोजन कठीण ; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत- संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत ढवळून निघत असताना ऑलिम्पिक आयोजन कठीण असल्याचे मत जपानमधील डॉक्टर्स युनियनने व्यक्त केले आहे. ‘अशा परिस्थितीत सुरक्षित आणि शानदार आयोजन होणे कठीण आहे. आमचा आयोजनास विरोध असल्याचे या तज्ज्ञांनी म्हटले आहे. - टोकियोतील आयोजनादरम्यान जपानमध्ये जगभरातून कोरोनाच्या नव्या साथीचा शिरकाव होणे शक्य असल्याचा धोका या तज्ज्ञांनी एका लेखी निवेदनात व्यक्त केला आहे.