नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सध्या २० वर्षांखालील मुलांची राष्ट्रीय खुली ४०० मीटर अजिंक्यपद ( National Open 400m Championships) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले आहेत आणि आपली छाप सोडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या दलीप गावित ( Dalip Gavit) यानं सर्वांचे लक्ष वेधले आहे. एकच हात असलेल्या दलीपनं त्याच्या अपंगत्वाचं कोणतही भांडवल न करता अन्य स्पर्धांसोबत सहभाग घेतला आणि ४९.८९ सेकंदाची वेळ नोंदवून उपांत्य फेरीत स्थानही पटकावले.
महाराष्ट्रातीलनाशिक जिल्ह्यातल्या या १८ वर्षीय खेळाडूचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. तीन वर्षांचा असताना एका अपघातात त्यानं हात गमवाला. ''मी स्वतःला अपंग समजतच नाही,'' उपांत्य फेरीतील स्थान पक्कं केल्यानंतरचे हे दलीपचे वाक्य.. पाच वर्षांपासून तो वैजनाथ दयानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
काळे यांनी दलीपला दत्तक घेतले आहे. पण, दलीप आजही त्याच्या खऱ्या आई-वडिलांच्या संपर्कात आहे. नाशिकमधील तराडोंगरी गावात त्याचे खरे आई-वडील शेतीचं काम करतात. ''दलीप नेमकं काय करतोय, हे त्याच्या वडिलांना माहितही नसेल. मी जेव्हा त्यांच्याकडे दलीपला दत्तक घेण्याची मागणी केली आणि त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की, त्याचं सर्वकाही तुम्हीच करणार ना?. मी हो म्हणालो आणि ते दत्तक देण्यास तयार झाले,''असे काळे यांनी TribunIndia शी बोलताना सांगितले.
दलीपची ही पहिलीच स्पर्धा नाही, त्यानं याआधीही अनेक स्पर्धांमध्ये पदक जिंकली आहेत. महाराष्ट्र संघाकडून त्यानं ४ बाय १०० सांघिक व ४ बाय ४०० सांघिक गटात अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतील T46 गटाच्या ट्रायलसाठी तो गेला होता, परंतु तो पात्रता वेळ गाठू शकला नाही.