नवी दिल्ली : एक वर्ष बाहेर बसल्याचा मला फायदाच झाला आहे. मी अधिक शांत झाली असून चिंतनशील बनली आहे, असे माजी विश्व चॅम्पियन बॉक्सर एल. सरितादेवी हिने सांगितले. आशियाई स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभव झाल्यानंतर कांस्य पदक नाकारल्याने वादग्रस्त ठरलेल्या सरितावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने (एआयबीए) एका वर्षाची बंदी ठोठावली होती. गुरुवारी सरितावरील ही बंदी उठणार असून ती आंतरराट्रीय स्तरावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे.आशियाई स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या पार्क जी ना विरुद्धच्या उपांत्य सामन्यात पंचांनी दिलेल्या निर्णयाचा विरोध करताना सरिताने पोडियमवर थेट कांस्य पदक स्वीकारण्यास मनाई करताना हे पदक पार्क जी नाकडे सुपूर्द करुन वाद ओढवला होता. यावेळी ती पोडियमवर रडली. तर या प्रसंगानंतर सरिताने आयोजकांचे आणि एआयबीएची माफी देखील मागितली. सरितावर आॅक्टोबर २०१४ ते आॅक्टोबर २०१५ पर्यंत बंदी लादण्यात आली होती. तसेच १०० स्विस फ्रँकचा दंड देखील ठोठावला होता.सध्या सरिता आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्ण विजेता डिंको सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे सराव करीत आहे. माझ्यामते मी पुर्वीपेक्षा अधिक चांगली बॉक्सर बनली आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून बॉक्सिंग करीत असून अजूनही माझ्या खेळात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या एक वर्षाच्या बंदीच्या काळात मी अधिक चिंतन केले असून शांतचित्त झाली आहे. मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या मी अधिक चांगली खेळाडू बनली आहे, असे सरिताने सांगितले. मी आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी उत्सुक असून पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच रिओ आॅलिम्पिक प्रवेश करुन आॅलिम्पिक सुवर्ण पटकावण्याचे माझे लक्ष्य आहे, असेही सरिताने सांगितले. (वृत्तसंस्था)पुनरागमन आव्हानात्मक...पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्पर्धेद्वारे माझे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन होणार असूने हे आव्हानात्मक असेल. ही स्पर्धा रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी महत्त्वाची स्पर्धा असल्याने मोठा कस लागेल. जागतिक स्पर्धेच्या काही दिवसांपुर्वीच मी लिवरपूलला रवाना होईल, असे सरिता म्हणाली. -------------एक वर्षाचा काळ पटकन गेला. मी आराम केलेच आणि उजव्या मनगटाची शस्त्रक्रीयाही करुन घेतली. ग्लास्गो राष्ट्रकुलमध्ये झालेल्या दुखापतीसह मी आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला होता. एकूणच या सर्व घडामोडी कालच्याच वाटत आहेत. वेळ कसा गेला तेच कळलं नाही.- सरिता देवी
एक वर्ष बंदीचा फायदाच झाला : सरितादेवी
By admin | Published: September 30, 2015 11:28 PM