ऑनलाइन लोकमत
धर्मशाळा, दि. 23 - ऑस्ट्रेलियाविरोधात होणा-या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली खेळणार की नाही हे अजून अस्पष्टच आहे. याबद्दल विराट कोहलीला विचारलं असता जर 100 टक्के फिट असलो तर खेळणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. कसोटी सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्याने ही माहिती दिली. विराट कोहलीने आपलं खेळणं फिटनेसवर अवलंबून असल्याचं सांगितल्याने त्याची खेळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती.
यानंतर विराट तिस-या कसोटी सामन्यातही खेळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र विराट कोहली मैदानात उतरल्याने आता तो फिट असल्याचं बोललं जात होतं. दुखापतीमुळे चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या खेळण्यावर साशंकता व्यक्त केली जात आहे. उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीतून तो अद्याप सावरला नसल्यामुळे शनिवारी धर्मशाळा येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात मुकण्याची शक्यता आहे.
I'll only play if I'm 100% fit: Virat Kohli ahead of 4th test against Australia. pic.twitter.com/z5IaiknZ1d— ANI (@ANI_news) March 24, 2017
विराट कोहलीला झालेली दुखापत किती गंभीर आहे याबाबतची माहिती अद्याप आलेली नाही, पण संघव्यवस्थापकांनी मुंबईकर फलंदाज श्रेअस अय्यरला धर्मशाळा येथे पाचारण केले आहे. यापुर्वीच भारतीय संघासोबत वेगवान गोलंदाज मोहमद्द शमीही धर्मशाळा येथे पोहचला आहे.
चौथ्या कसोटीत दुखापतीमुळे विराट कोहली संघाबाहेर बसला तर मुंबईकर अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. चौथ्या कसोटीत रहाणेने कर्णधारपद सांभाळल्या सचिननंतरचा पहिलाच मुंबईकर कर्णधार असेल. चार कसोटी सामन्याची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत असून धर्मशाळा येथील कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरतील. विराट कोहली संघाबाहेर गेल्यास भारताची फलंदाजी कुमकुवत होऊ शकते.