ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी मी किती वेळ देऊ शकतो तसेच मला माझ्या क्षमतेबद्दल खात्री असेल तरच मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारेन असे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने बुधवारी स्पष्ट केले. रवी शास्त्री यांचा संघ संचालक म्हणून करार संपल्यानंतर बीसीसीआयच्या सल्लागार समितीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविडकडे विचारणा केली आहे.
राहुल द्रविडला प्रशिक्षकपदाच्या नव्या प्रस्तावाबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, असे निर्णय झटपट घेता येत नाहीत. पूर्ण विचार करुन निर्णय घेणार असल्याचे त्याने सांगितले. तुम्ही जी जबाबदारी स्वीकारताय तिला १०० टक्के न्याय देता आला पाहिजे. वेळ दिला पाहिजे. निकाल काय येतो त्यापेक्षा तुम्ही स्वीकारलेली जबाबदारी तितक्या समपर्ण भावनेने निभावणार का ?, वेळ देणार ? ते म्हत्वाचे आहे असे द्रविड म्हणाला.
मला चांगला फलंदाज बनायचे असेल तर, त्यासाठी मला त्याग, समर्पण भावनेने झोकून द्यावे लागेल असे द्रविडने सांगितले. प्रशिक्षक ही अशी प्रक्रिया आहे जिथे तुम्ही दरदिवशी नवीन काही तरी शिकत असता. प्रशिक्षकपदासाठी मी तसा खूप तरुण आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खेळाडू, कर्णधार म्हणून मी विचार करत नव्हतो. प्रशिक्षक झाल्यानंतर मला तो विचार करावा लागेल असे द्रविडने सांगितले. द्रविड सध्या भारत अ आणि अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक आहे. दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचाही तो मार्गदर्शक आहे.