Asian Games 2023 : चीनमधील हांगझोऊ शहर पुढील काही दिवस क्रीडा विश्वाच्या केंद्रस्थानी असणार आहे. कारण येथील हांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धेला रंगतदार सुरुवात झाली आहे. या उद्घाटन समारंभात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन यांनी भारताचे नेतृत्व केले. बहुचर्चित स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील उपस्थित होते. अशाप्रकारे खेळाडूंच्या मेळाव्यासह आशियाई क्रीडा स्पर्धेला अधिकृतपणे सुरूवात झाली. २०२३ च्या आशियाई स्पर्धेत भारताचे ६५५ शिलेदार रिंगणात आहेत. ६५५ भारतीय खेळाडू ४० विविध खेळांमध्ये देशाचे प्रधिनिधित्व करतील.
१२ हजारहून अधिक खेळाडूंचा सहभाग यापूर्वी जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ५७२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. लक्षणीय बाब म्हणजे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४५ देशांतील १२ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. खरं तर यापूर्वी २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही क्रिकेट हा आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग होता, परंतु बीसीसीआयने आपला संघ पाठवला नव्हता. मात्र, यावेळी बीसीसीआयने यावेळी आपले पुरुष आणि महिला दोन्ही संघ पाठवले आहेत.
दरम्यान, बांगलादेशच्या पुरुष क्रिकेट संघाने आशियाई स्पर्धेत २०१० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तर, महिला क्रिकेटमध्ये पाकिस्तानने सुवर्णपदक जिंकले आहे. यानंतर श्रीलंकेच्या पुरूष संघाला २०१४ मध्ये सुवर्ण पदक जिंकण्यात यश आले. तर महिला गटात पाकिस्तानने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे यंदा क्रिकेटशिवाय कुस्ती, बॅडमिंटन आणि बॉक्सिंगसारख्या स्पर्धांमध्येही भारतीय चाहत्यांना सुवर्णपदकाची आशा असेल.