ऑनलाइन लोकमतत्रिनिदाद, दि. 24 : भारत वि. वेस्ट इंडिज यांच्यादरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. सतत येणाऱ्या पावसाच्या व्यत्ययानंतर पंचांनी हा निर्णय घेतला. दोन तास पावसानी बॅटींग केल्यानंतर पंचांनी वेस्ट इंडिजला डकवर्थ लुईस नियमांनुसार 29 षटकांत 194 धावांचे आव्हान दिले. पण पुन्हा पावसाची बॅटींग सुरु झाली. त्यानंतर पंचांनी सामना अनिर्णीत घोषित केला. त्यामुळे पाच सामन्याच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना रद्द झाला आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये डावाची सुरुवात केलेल्या अजिंक्य रहाणे याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आश्वासक सुरुवात करताना शानदार अर्धशतक झळकावले. रहाणे -शिखर धवन यांनी १३२ धावांची जबरदस्त सलामी देत भारताला दमदार सुरुवात करून दिली. पावसामुळे दुसऱ्यांदा खेळ थांबला तेव्हा भारताने ३९.२ षटकांत ३ बाद १९९ धावांची मजल मारली. दोन्ही सलामीवीरांना मात्र आपल्या खेळीचे शतकात रूपांतर करण्यात अपयश आले.पोर्ट आॅफ स्पेन येथे यजमानांनी नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही सामना खेळण्यास न मिळाल्यानंतर रहाणेला रोहितच्या जागी डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना रहाणेने शानदार फलंदाजी केली. त्याने धवनसह संघाच्या धावसंख्येला आकार देताना ७८ चेंडंूत ८ चौकारांसह ६२ धावा काढल्या. रहाणे मोठी धावसंख्या उभारणार असे दिसत असतानाच, खराब फटका मारुन तो बाद झाला. अल्झारी जोसेफने टाकलेला अप्रतिम हळुवार चेंडूवर रहाणे चकला. आक्रमक फटका मारण्याच्या नादात उंच उडालेला झेल सहजपणे पकडून जेसन होल्डरने रहाणेला तंबूचा रस्ता दाखवला.दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम फलंदाज ठरलेल्या धवनने आपला फॉर्म कायम राखताना विंडीज गोलंदाजांची पिटाई केली. रहाणे बाद झाल्यानंतर त्याने कोणतेही दडपण न घेता कर्णधार कोहलीसह भारताच्या धावांची गती कमी होऊ दिली नाही. त्याने ९२ चेंडूत ८ चौकार व २ षट्कारांसह ८७ धावांची खेळी केली. अवघ्या १३ धावांनी त्याचे शतक हुकले. देवेंद्रो बिशूच्या अप्रतिम चेंडूवर तो पायचित झाला. युवराज सिंग ४ धावांवर बाद झाल्याने भारताचा डाव घसरला. यानंतर कोहलीने (३२*) संयमी फलंदाजी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रशिक्षकाविना विंडीज दौऱ्यावर आलेला संघ, कर्णधार कोहली आणि नुकताच प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलेले अनिल कुंबळे यांच्यातील वादप्रकरण अशा घडामोडीनंतर भारताच्या कामगिरीवर क्रिकेटविश्वाचे लक्ष होते. परंतु, फलंदाजांनी या सर्व गोष्टींचा आपल्या कामगिरीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ दिला नाही. धावफलकभारत : अजिंक्य रहाणे झे. होल्डर गो. जोसेफ ६२; शिखर धवन पायचित गो. बिशू ८७, विराट कोहली नाबाद ३२, युवराज सिंग झे. लेविस गो. होल्डर ४, महेंद्रसिंग धोनी खेळत आहे ९. अवांतर- ५. एकूण : ३९.२ षटकात ३ बाद १९९ धावा. गोलंदाजी : जेसन होल्डर ८-०-३४-१; अल्झारी जोसेफ ८-०-५३-१; अॅश्ले नर्स ४-१-२२-०; मिग्युएल कमिन्स ८-०-४६-०; देवेंद्रो बिशू १०-०-३९-१, कार्टर १.२-0-५-0.