- अयाझ मेमन, संपादकीय सल्लागारपुण्यातील सामना तीन दिवसांत गमावल्यानंतर बंगलोर कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांपुढे मोठे आव्हान असेल. मी फलंदाजांसाठी अशासाठी म्हणतोय, कारण गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. असे असताना ज्याप्रकारे भारताची फलंदाजी पहिल्या सामन्यात कोसळली, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. बलाढ्य फलंदाजी मानल्या जाणाऱ्या भारताला अचानक झाले काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला. विराट कोहली, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे सारेच अपयशी ठरले. केवळ के. एल. राहुलने त्या खेळपट्टीवर अर्धशतक ठोकले. त्यावेळी, थोडीफार आशा वाटलेली की भारतीय फलंदाज आॅसी फिरकीविरुध्द काहीतरी चांगली कामगिरी करतील. पण, सर्वांच्याच पदरी निराशा आली. आता, दुसऱ्या कसोटीत हा सामना अधिकाधिक दिवसापर्यंत खेचण्याचा प्रयत्न भारतीयांनी करायला हवा. आॅस्टे्रलियाकडेही चांगले गोलंदाज आहेत, जे फिरकी खेळपट्टीवर चित्र बदलू शकतात आणि हे आपण पुणे कसोटीमध्ये पाहिले आहे. तेव्हा असे अजिबात नाही, की फिरकी खेळपट्टीवर केवळ भारतीय गोलंदाजंच पाहुण्या संघावर वर्चस्व गाजवू शकतात. जर फिरकी खेळपट्टी असेल, तर भारतीय फलंदाजीही कमजोर होते हे सिध्द झाले आहे. आता, पहिला सामना मोठ्या अंतराने गमावला असून भारतीय संघ बॅकफूटवर आहे हे नक्की. पण माझ्यामते, अजूनही भारतीय संघाने मालिका गमावलेली नाही. पण मी असेही सांगू इच्छितो की, बंगलोर कसोटी अनिर्णित राहिल्यास किंवा आॅस्टे्रलियाने जिंकल्यास भारतीय संघावर ही मालिका गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळेच, भारतीय संघाला कमबॅक करण्याची हीच संधी आहे, या सर्व गोष्टी ध्यानात ठेवूनच टीम इंडियाला बंगलोरच्या मैदानावर उतरावे लागेल.
भारताला कमबॅक करण्याची हीच संधी
By admin | Published: March 04, 2017 12:18 AM