पोर्ट आॅफ स्पेन : अजिंक्य रहाणेच्या उपस्थितीमुळे संघ समतोल बनतो. तसेच, त्याच्यामुळे अतिरिक्त गोलंदाज खेळविण्याची संधीही मिळते, अशा शब्दांत कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सामनावीर रहाणेचे कौतुक केले. विंडीजवर १०५ धावांनी विजय मिळविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कोहलीने सांगितले की, ‘गेल्या काही काळापासून रहाणे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटचा भाग आहे आणि सर्वांना माहीत आहे की, आघाडीच्या क्रमांकासाठी त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. तो कायम तिसऱ्या सलामीवीराच्या रूपामध्ये सज्ज असतो. या मालिकेतील आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या खेळीला चांगला वेग दिला. तो कसोटी क्रिकेटमध्ये स्थिर झालेला असून, मर्यादित क्रिकेटमध्ये छाप पाडण्यास तो उत्सुक आहे.’‘त्याने स्वत:वरील दबाव कमी करण्यास सुरुवात केली असून तो आपल्या खेळीचा आनंद घेत आहे. रहाणे मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. विश्वचषक २०१९ सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याची संधी देईल. विशेष म्हणजे रहाणे डावाची सुरुवातही करू शकतो आणि मधल्या फळीतही खेळू शकतो.’
कुलदीप यादवने जबरदस्त मारा केला. त्याचे क्रॉस सीम चेंडू दोन्ही बाजूला फिरकी घेऊ शकतात. आयपीएलमध्ये मी त्याचा सामना केला आहे. या सामन्यातील सुक्या खेळपट्टीवर त्याने अप्रतिम मारा केला. या कौशल्यामुळेच तो धोकादायक गोलंदाज बनतो. यासाठी त्याला श्रेय दिले गेले पाहिजे. - विराट कोहली