नवी दिल्ली : बीसीसीआयच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकांच्या समितीच्या (सीओए) सदस्य डायना एडलजी यांना एकरकमी लाभ देणे हे दुटप्पी भूमिकेत मोडत असल्याने त्यांना हा लाभ देऊ नये, अशा आशयाचे पत्र कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी लिहिले आहे.एडलजी यांच्यासोबत १९७० च्या दशकात केवळ एक कसोटी सामना खेळणारी त्यांची बहीण बेहरोज यांनादेखील एकरकमी लाभ मिळू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सीओएकडे प्रशासकीय जबाबदारी येताच माजी खेळाडूंना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बीसीसीआयने दबक्या आवाजात या निर्णयास विरोध दर्शविला, पण कोषाध्यक्षांच्या पत्राने हा मुद्दा जगजाहीर झाला. चौधरी हे सीओए आणि सीईओ राहुल जोहरी यांचे कट्टर विरोधक मानले जातात.बीसीसीआयच्या विविध खर्चांची देणी देताना कोषाध्यक्षांना विश्वासात घेतले जात नाही. सोओएच्या परवानगीने व्यवहार होत असल्याने चौधरी नाराज आहेत. एसजीएमनंतर एकरकमी लाभ वाटण्यात आल्याच्या कृतीवर चौधरी यांनी तीव्र हरकत नोंदविली.एडलजी सीओए सदस्य आहेत आणि स्वत: लाभ घेत असून बहिणीला लाभ पोहोचवित असल्याचा चौधरी यांचा आक्षेप आहे. दुसरीकडे या मुद्यावर चर्चा झाली. त्या वेळी एडलजी यांनी बैठकीपासून स्वत:ला अलिप्त ठेवले होते, असे उत्तर एडलजी यांच्या बचावात सीओएने दिले आहे. (वृत्तसंस्था)बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाºयानुसार एडलजी बैठकीपासून अलिप्त होत्या, असे मानले तरी बैठकीतील निर्णय एडलजी यांना माहिती नव्हते, यावर विश्वास बसत नाही.एडलजी पदावर कायम राहू शकतात, तर मग राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य असलेले रॉजर बिन्नी यांना त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी संघात येण्यास धडपड करीत असताना पदावरून का हटविण्यात आले? स्टुअर्टच्या निवडीवर चर्चेच्या वेळी रॉजर बाहेर जायचे हे सर्वश्रुत आहे. लोढा पॅनलच्या शिफारशींमुळे बिन्नी स्वत:चा कार्यकाळ पूर्ण करू शकले नव्हते.
डायना एडलजींना लाभ देण्यास विरोध - अनिरुद्ध चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 1:16 AM