शिमला : टी-२० विश्वचषकात धर्मशाला स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत होणार आहे. या सामन्याला पठाणकोट हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांनी विरोध केला आहे. हा सामना १९ मार्च रोजी होईल. हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह म्हणाले, की सैन्यदलाचे माजी अधिकारी आणि शहिदांच्या कुटुंबीयांनी या सामन्याला विरोध केला आहे. पाकिस्तानविरोधात होणाऱ्या सामन्याला नागरिकांचा विरोध आहे. मात्र, अन्य सामन्यांना नागिरकांकडून विरोध होत नाही.पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या दोन सैनिकांचे नातेवाईक कांगडा जिल्ह्यात राहतात. त्यांच्या नातेवाइकांनी धर्मशाला स्टेडियममध्ये पाकिस्तानी संघाच्या येण्याला विरोध केला आहे. सिंह म्हणाले की, ‘‘विरोधी पक्षानेदेखील या सामन्याला विरोध केला आहे. हा सामना धर्मशाला येथे आयोजित न करण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, राज्य सरकार दोन्ही संघांना पूर्ण समर्थन देण्यासाठी कटिबद्ध आहे.’’परिवहनमंत्री जी. एस. बाली यांनी हा सामना अन्य राज्यात आयोजित करण्यासाठी १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. बाली म्हणाले, ‘‘हा सामना इतर राज्यात आयोजित केला नाही, तर जिल्ह्यात त्याला विरोध केला जाईल.’’ तसेच, मोठ्या संख्येने आमदार आणि भाजप नेत्यांनी धर्मशाला स्टेडियमच्या बाहेर शहीद पार्कमध्ये धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. (वृत्तसंस्था)
वर्ल्डकपमधील भारत-पाक सामन्याला विरोध
By admin | Published: February 28, 2016 1:03 AM