आंतरराष्ट्रीय थ्रो-बॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमचा सागर होगाडेनं 'सर्वात आकर्षक खेळाडू'चा मान पटकावला. या स्पर्धेत भारतासह, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ, दुबई, शारजा, अबुधाबी आदी आशियातील 10 संघांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाला उपांत्य सामन्यात दुबईकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाचे जेतेपदाचे स्वप्न अपूर्णच राहिले. सागरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
थ्रो-बॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे भारतीय संघाने दुबई येथील आंतराराष्ट्रीय थ्रो-बॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये उपांत्य सामन्यात भारताला दुबईकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, दुबई आणि अबुधाबी यांच्यामध्ये अंतिम सामना रंगला. त्यात दुबईने तीन सेटमध्ये अनुक्रमे 15-12, 13-15 आणि 15-14 असा विजय मिळवत चॅम्पियनशीप पटकावले. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार सागर याला स्पर्धेतील सर्वोत्तम आकर्षक खेळाडू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ही स्पर्धा दुबईत 16 नोव्हेंबर रोजी पार पडली. सागर हा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमचा रहिवास असून सध्या पुण्यातील सहारा क्रिकेट अकादमी व एच.के. बाऊन्स क्रिकेट अकादमी येथे क्रिकेटचा सराव करत आहे. भूमसारख्या ग्रामीण भागातून येऊनही गुरुजनांचं मार्गदर्शन, पाठिंबा व आशीर्वादाच्या जोरावर मी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकलो. यापुढेही थ्रो-बॉल क्रीडा प्रकारात देशाचे नाव उज्ज्वल करत राहिल, असे सागरने म्हटले.