कोलंबो : आमच्या संघात श्रीलंकेविरुद्ध मुसंडी मारण्याची क्षमता आहे आणि खेळाडू उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करण्यास आतुर असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे. कसोटी सामन्याच्या उंबरठ्यावर कोहली म्हणाला, ‘‘आम्ही निश्चितच मुसंडी मारण्याची क्षमता ठेवतो. जे काही झाले, त्याविषयी विचार करण्यात अर्थ नाही. तुम्ही एखाद्या सामन्यात ६ सत्रांत वर्चस्व ठेवता याचा अर्थ तुम्ही कसोटी सामन्यात टॉपवर राहिला आणि तुम्हाला सामना जिंकायला हवा. परंतु, या वेळी असे झाले नाही; पण कसोटी सामन्यासाठी तयारी खूप चांगली केली आहे. ही शिकण्याची प्रक्रिया आहे आणि पराभवातून कसे सावरायचे व पुढील सामन्यासाठी कसे सज्ज व्हायचे, हे खेळाडू शिकतील. चांगली बाब म्हणजे सर्वच जण कामगिरी उंचावण्यासाठी आतुर आहेत. सर्व खेळाडू व्यावसायिक आहेत. त्यामुळे अशा बाबी विसरणे आवश्यक असल्याचे खेळाडूंना माहीत आहे.’’ दुखापतीतून सावरलेला सलामीवीर मुरली विजय संघाच्या अंतिम ११ जणांत असेल, अशी आशाही कोहलीने व्यक्त केली.आमच्यासाठी भावनात्मक सामना : मॅथ्यूजकोलंबो : गुरुवारपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा संघ त्यांचा महान फलंदाज कुमार संगकाराला विजयी निरोप देऊ इच्छितो, असे श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने म्हटले आहे. संगकारा दुसऱ्या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे आणि श्रीलंकेसाठी हा खूप भावनात्मक क्षण असेल, असेही मॅथ्यूजने सांगितले. तो म्हणाला, ‘‘हा आमच्या सर्वांसाठी खूप भावनात्मक सामना असेल. कारण श्रीलंकेचा महान खेळाडू, संघाचा महान सेवक आणि महान व्यक्ती निवृत्त होत आहे. श्रीलंका क्रिकेट आणि संघासाठी इतकी वर्षे त्याने जे केले आहे, त्यासाठी आम्ही त्याचे पुरेसे आभार मानू शकत नाही. सर्वोत्तम करू शकतो तो हा सामना जिंकण्याचा आणि मालिका जिंकण्याचा प्रयत्न. हा त्याच्यासाठी सर्वोत्तम निरोप ठरेल.’’स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीमुळे आमच्या संघात समतोल येईल. तसेच, त्याच्या सहाव्या स्थानावरील फलंदाजीनेही आम्हाला मदत मिळेल. तो संघात आल्याने आम्हाला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा पर्याय असेल. मी त्याला झिम्बाब्वे आणि इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना पाहिले आहे. आत्मविश्वास मिळविल्यानंतर तो खूप चांगली फलंदाजी करतो आणि त्याचे तंत्रही चांगले आहे. खेळपट्टीकडून थोडी मदत मिळत असल्यास आणि तुम्हाला पूर्ण डावादरम्यान नियंत्रण कायम ठेवायचे असल्यास स्टुअर्ट बिन्नी खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकतो.- विराट कोहली
मालिकेत मुसंडी मारण्याची आमच्यात क्षमता : कोहली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2015 11:13 PM