ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - भारतीय क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीचं कौतुक केलं असून जेव्हा कधी मी संकटात असेन, किंवा पेचात अडकलो असेन तेव्हा त्याचा सल्ला घेण्यापासून लाजणार नाही असं म्हटलं आहे. इंग्लंडसोबतच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीची पत्रकार परिषद पार पडली. धोनी सर्वात हुशार खेळाडू असून डीआरएस वापरण्याचा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा त्याच्याशी नक्की चर्चा करणार असंही विराट बोलला आहे.
इंग्लंडविरोधात होणा-या एकदिवसीय सामन्यात प्रथमच महेंद्रसिंग धोनी विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. धोनी पुर्णवेळ विकेट कीपर आणि फलंदाज म्हणून खेळताना त्याच्यावरचा दबाव नक्की कमी झालेला असेल असा विश्वास विराटने यावेळी व्यक्त केला. 'तो मोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने फलंदाजी करेल असं मला वाटतं. मोठा शॉट खेळताना तो दोनदा विचार करणार नाही', असं विराटने सांगितलं आहे.
भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत तिस-या क्रमांकावर आहे. इंग्लंडसोबतच्या या मालिकेनंतर भारत कोणतीही एकदिवसीय मालिका खेळणार नसून जूनमध्ये होणा-या चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी तयारी करणार आहे.
His word would be the one I would trust on DRS. He is the most intelligent cricketer around: Virat Kohli on MS Dhoni— ANI (@ANI_news) 14 January 2017
याअगोदर शुक्रवारी धोनीची पत्रकार परिषद पार पडली. मी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीला वेळोवळी सल्ला देत राहीन असं महेद्रसिंग धोनी बोलला. भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच महेंद्रसिंग धोनीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी धोनीने विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक करत त्याच्यासाठी कर्णधार होण्याची ही योग्य वेळ होती असं म्हटलं आहे.