- लेरॉय सॅने लिहितो...मँ चेस्टर सिटीने आपल्याला घसघश्ीत रक्कम देऊन जर्मनीहून इंग्लंडला का बोलावून घेतले, हे सिद्ध करण्यासाठी लेरॉय सॅने खूप उत्सुक आहे. सॅनेला ३७ मिलियन युरो इतकी मोठी किंमत देऊन सिटीने आपल्या संघात घेतले. शिवाय, अडखळत्या सुरुवातीनंतर त्याने मोक्याच्या वेळी संघासाठी प्रिमीयर लीगच्या गेल्या दोन लढतींत अनुक्रमे आर्सेनाल व टॉटनहॅमविरुद्ध गोल करून आपली उपयुक्तता सिद्ध केली. सध्या गुणतालिकेत सिटी पाचव्या स्थानी असून, अव्वल स्थानी असलेल्या चेल्सीमध्ये आणि मँचेस्टर सिटीमध्ये १२ गुणांचे अंतर आहे. त्यामुळेच स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी संघ प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांना २१ वर्षीय सॅनेकडून खूप अपेक्षा आहेत. विजयी ३ गुणांव्यतिरिक्त सिटीला काहीही अपेक्षित नाही. त्यामुळेच युवा आणि फॉर्ममध्ये असलेल्या सॅनेवर मँचेस्टर सिटीची सध्या मुख्य मदार असेल.जर्मनीहून इंग्लंडला आल्यापासून तू मोक्याच्या वेळी लक्षवेधी ठरलास. सध्या सर्व काही तुला अनुकूल ठरत असल्याचे वाटते का?सध्या माझी कामगिरी चांगली होत आहे. मँचेस्टरला माझ्या घरचे वातावरण अनुभवत आहे. शिवाय, पुढील काही आठवडे आणि महिने माझ्यासाठी नव्या संधी घेऊन येणारे ठरणार आहेत. नव्या क्लबमध्ये सुरुवातीलाच दुखापतग्रस्त होणे चांगली बाब नाही. मला हॅमस्ट्रिंगची अडचण होती आणि त्यातून सावरण्यासाठी काही वेळ हवा होता; पण त्यानंतर झोकात पुनरागमन करताना मी संघासाठी गोल करण्यात यशस्वी ठरलो. यंदाचे मोसम सिटीसाठी चढ-उताराचे ठरले. गेल्या आठवड्यात टॉटनहॅमविरुद्ध २-० अशा आघाडीवर असताना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. काय सांगशील?खरं म्हणजे तो कठीण सामना ठरला. आम्ही विजयाचे हक्कदार होतो. सामना पूर्णपणे आमच्या बाजूने होता; परंतु अखेर आम्ही सामना जिंकण्यात अपयशी ठरलो. आगामी वेस्ट हॅमविरुद्धच्या लढतीत ही सर्व भरपाई भरून काढणार का?आम्ही केवळ सकारात्मकपणे खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत. टॉटनहॅमविरुद्धच्या निकालाने नक्कीच आम्ही निराश आहोत. आम्ही नियंत्रण राखताना पहिल्या सत्रात व त्यानंतरही वर्चस्व ठेवले होते. त्यामुळेच जास्त दु:ख आहे. पण, आम्ही चांगला खेळ केला आणि सामन्यागणिक तो उंचावण्याचा प्रयत्न राहील. माझ्याबाबत सांगायचे झाल्यास, मी गेल्या दोन सामन्यांत गोल केले असून तेच सातत्य कायम राखण्याचा प्रयत्न राहील.तू सांगितल्याप्रमाणे या क्लबमध्ये तू खूष आहेस. सहा महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये रुळला आहेस का?कदाचित हो. मँचेस्टर मला माझ्या घरासारखंच वाटत आहे. शिवाय, माझ्या संघहकाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले आहे. मी क्लबमध्ये जागा मिळविण्याचा प्रयत्न करीत असून, ते मी मिळविले आहे. संघातील शानदार खेळाडूंसह खेळताना क्लबला विजयी करण्यासाठी आम्ही संघभावनेने खेळतो. मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. सुपरस्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या सिटी संघात स्वत:ची ओळख निर्माण करणे नक्कीच सोपे गेले नसेल?नक्कीच. कारण, संघातील प्रत्येक जागेवर सर्वोत्तम खेळाडू सज्ज आहे. याचा अर्थ, संघात स्थान मिळविण्यासाठी तुम्हाला सरावातही चमक दाखविणे अनिवार्य ठरते. यासाठी तुम्हाला आत्मविश्वास दाखवावा लागतो. त्या जोरावरच स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करू शकता.मॅनेजर पेप गॉर्डिओला यांच्याविषयी काय सांगशील?गॉर्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणे म्हणजे शिक्षणासारखे आहे. ते सर्व बघत असतात आणि जेव्हा त्यांना काही चुका निदर्शनास येतात, तेव्हा गॉर्डिओला स्पष्टपणे तसे सांगतात. ते खेळाडूंना त्यांच्या चुका सुधारण्यास मदत करतात. खेळाडूंसाठी ते कायम तयार असतात.गॉर्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू म्हणून तुझी प्रगती झाली का?हो. इतकंच काय कमी वेळेमध्ये इंग्लंडमध्ये गॉर्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप काही शिकलो. माझ्या मते, खेळाडू म्हणून त्यांनी माझ्यात खूप प्रगती केली आहे. स्ट्रायकरसह मी अनेक पोझिशनवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलो आहे आणि त्यातून अनेक जबाबदाऱ्यांची जाणीव झाली. सिटीची पुढील वाटचाल कशी असेल? मोठे यश मिळविण्यात यश येईल का?नक्कीच. मला विश्वास आहे. हा असा क्लब आहे, जो आपले लक्ष्य साधतो. या क्लबचा सदस्य असल्याचा आनंद आहे. संघात जोश जबरदस्त आहे. संघासाठी प्रिमीयर लीग, चॅम्पियन लीगचे जेतेपद जिकून देण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत. आम्ही आता केवळ प्रत्येक सामना जिंकून चेल्सीला गाठण्याचा प्रयत्न करू. काही चांगल्या संघांविरुद्ध आम्ही बाजी मारली; परंतु त्याहून अधिक चांगल्या कामगिरीची आवश्यकता असल्याची जाणीवही आम्हाला आहे.(पीएमजी)
आमचा सकारात्मक खेळ करण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 01, 2017 4:58 AM