नागपुरात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आमच्यासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. या लढतीत विजय मिळविला, तर दिल्लीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात मालिका विजयाच्या निर्धाराने आम्ही मैदानात दाखल होऊ. पराभवाचा अर्थ आॅगस्ट २००६ नंतर विदेशात मालिका गमावणारा पहिला दक्षिण आफ्रिका संघ ठरेल. गेल्या नऊ वर्षांत आम्ही विदेशात १२ कसोटी मालिका खेळल्या. त्यापैकी ८ मध्ये आम्ही विजय मिळविला, तर चार मालिका अनिर्णित राखल्या. आम्हाला या कामगिरीचा अभिमान आहे. विदेशातील कामगिरीत सातत्य राखण्याची मालिका खंडित होणार नाही, यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्नशील आहे. या लढतीच्या निमित्ताने आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या लढतीत आम्ही चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहोत. यापूर्वीच्या कामगिरीचा विचार केला, तर आमच्यावर दडपण आले असताना आम्ही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आगामी पाच दिवस आमच्यावर दडपण राहणार आहे; पण दडपणाखाली आम्ही चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरू, असा मला विश्वास आहे. येथील खेळपट्टी कोरडी, ठणठणीत असून ही आश्चर्याची बाब नाही. यजमान संघाला लाभ मिळेल, अशी खेळपट्टी तयार करण्याचा भारताला अधिकार आहे. खेळाचे हे स्वरूप असून त्याबाबत आमची काहीही तक्रार नाही. कोरड्या खेळपट्टीची आम्हाला कुठलीही अडचण नाही. भारतीय गोलंदाजांना मिळणारी मदत आमच्या गोलंदाजांनाही मिळेल. आमच्या गोलंदाजांनी गेल्या काही दिवसांमध्ये कसून सराव केला असून, परिस्थितीचा लाभ घेण्यात यश येईल, असा आम्हाला विश्वास आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत आमचे फलंदाजही भारतीय गोलंदाजांच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहेत. आम्ही वातावरणाशी जुळवून घेतले असून, फटक्यांची निवड करताना सावधगिरी बाळगावी लागेल. अखेर नागपूरच्या काही गोड आठवणी आहेत. २०१० मध्ये आम्ही येथे एक डाव ६ धावांनी विजय मिळविला होता. हाशिम अमलाने त्या लढतीत नाबाद २५३ धावांची खेळी केली होती, तर स्टेनने एकूण १० बळी घेतले होते. त्यानंतर २०११ मध्ये विश्वकप स्पर्धेत आम्ही येथे भारताविरुद्ध खेळलो होतो. त्यावेळी भारताने दिलेल्या २९७ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. नागपूरच्या या गोड स्मृतींची परंपरा कायम राखण्यात यशस्वी ठरण्याची आशा आहे. (टीसीएम)
आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
By admin | Published: November 24, 2015 11:53 PM