नवी दिल्ली : न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला असून, भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून तो ‘आऊट’ झाला आहे. सरावादरम्यान गोलंदाजी करताना साऊदीला पायाच्या दुखापतीने सतावले. स्कॅन करण्यात आल्यानंतर त्याच्या टाचेमध्ये ‘ग्रेड दोन’ची दुखापत असल्याचे निदर्शनास आले. साऊदी दुखापतीतून सावरण्यासाठी मायदेशी परतणार आहे. साऊदीला भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेपर्यंत फिट होण्याची आशा आहे. साऊदीची दुखापत न्यूझीलंडसाठी मोठा धक्का आहे. तो न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी कसोटी गोलंदाज आहे. त्याने ५२ कसोटी सामन्यांत ३२.६३ च्या सरासरीने १७७ बळी घेतले आहेत. चार कसोटी सामने खेळणाऱ्या मॅट हेन्रीची साऊदीच्या स्थानी निवड करण्यात आली आहे.न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन म्हणाले, ‘‘टीम साऊदीने या दौऱ्याच्या तयारीसाठी कसून मेहनत घेतली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घ्यावी लागल्यामुळे तो निराश झाला. टाचेच्या दुखापतीतून सावरण्यासाठी टीम साऊदीला ७ ते १० दिवस विश्रांती घ्यावी लागेल. त्यानंतर त्याला वन-डे मालिकेसाठी सरावाला सुरुवात करता येईल. साऊदीचा पर्याय म्हणून मॅट हेन्री सज्ज आहे. तो पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी संघासोबत जुळणार आहे.’’ न्यूझीलंड संघ सध्या फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये एकमेव सराव सामना खेळत आहे. (वृत्तसंस्था)
दुखापतीमुळे साऊदी कसोटी मालिकेतून ‘आऊट’
By admin | Published: September 18, 2016 5:46 AM