शांघाय : भारतात वेगवान गोलंदाजीत जो विकास झाला ते पाहून मी प्रभावित झालो, पण अत्यािधक क्रिकेटमुळे गोलंदाजी कला लुप्त होत असल्याची खंत वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी व्यक्त केली आहे.ते म्हणाले, ‘मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांचा मारा पाहून मी फारच प्रभावित झालो. गेल्या आॅक्टोबरमध्ये मी भारत दौरा केला त्या वेळी उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या पाहून बरे वाटले. १९८३ साली अशा खेळपट्ट्यांसाठी आम्ही आसुसलो होतो.’अत्याधिक क्रिकेटमुळे गोलंदाजीतील कलेचा ऱ्हास होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत होल्डिंग पुढे म्हणाले,‘लहान मैदान, मोठ्या बॅट्स, फिल्डिंगवरील नियंत्रण या नव्या बाबींमुळे दहा षटकांत कुठलाही गोलंदाज प्रभावी ठरत नाही. क्रिकेट अधिक होत असल्याने वेगवान गोलंदाजी संपुष्टात येण्याची भीती वाटते.’ नुकताच पार पडलेला विश्वचषक वेळखाऊ आणि बोअरिंग वाटल्याचे सांगून ते म्हणाले,‘सर्व सामने एकतर्फी झाले. काहीही स्पर्धात्मक नव्हते. विश्वचषकाचे कॅलेंडर लहान असते, तर कदाचित फरक पडला असता. पुढील विश्वचषकात आयसीसीने दहा पैकी अव्वल सहा संघांना मुख्य ड्रॉ मध्ये ठेवावे शिवाय चार संघांना प्ले आॅफ खेळण्याची संधी द्यावी.’ (वृत्तसंस्था)
अतिक्रिकेटमुळे गोलंदाजीची कला संपली : होल्डिंग
By admin | Published: April 16, 2015 1:28 AM