नवी दिल्ली : आघाडीचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याची हॉकी इंडियाने प्रतिष्ठेच्या आणि सर्वोच्च ‘खेलरत्न’ क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. त्याचवेळी अन्य तीन खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. मध्यरक्षक चिंग्लेनसाना सिंग आणि आक्रमक आकाशदीप सिंग या पुरुष खेळाडूंसह महिला संघाची आघाडीची बचावपटू दीपिका यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
हॉकी इंडियाने ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी आर. पी. सिंग आणि संदीप कौर यांचे नाव पाठविले आहे. तसेच, प्रशिक्षक बलजीत सिंग, बी. एस. चौहान आणि रोमेश पठानिया यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.जागतिक हॉकीमध्ये पी. आर. श्रीजेशची सर्वोत्तम गोलरक्षकांमध्ये गणना होते. अनेक स्पर्धांमध्ये त्याने आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांचे आक्रमण रोखताना भारताच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले. याशिवाय त्याने आपल्या कल्पक नेतृत्त्वाने विविध स्पर्धांमध्ये छाप पाडली आहे.
२००६ साली दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेल्या पदार्पणापासून श्रीजेश संघाचा मुख्य खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विद्यमान राष्ट्रीय हॉकी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या श्रीजेशने २०१४ व २०१८ विश्वचषक स्पर्धेसह २०१२ व २०१६ सालच्या आॅलिम्पिक स्पर्धांत भारतीय संघातून छाप पाडली आहे.