ग्वांग्झू : जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेली भारतीय स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने अ गटाच्या तिसऱ्या सामन्यात शुक्रवारी चीनची बिगजियाओ हिच्यावर मात केली. यासह वर्षाअखेरच्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सांगता केली. मागच्या वर्षीची विजेती सिंधू सलग दोन पराभवानंतर जेतेपदाच्या शर्यतीबाहेर पडली.
बिगजियाओविरुद्धही पहिल्या गेममध्ये सिंधू ९-१८ अशी पिछाडीवर पडली. त्यानंतर मात्र यशस्वी पुनरागमन करीत सिंधूने २१-१९, २१-१९ असा विजय मिळवून गटात तिसरे स्थान घेतले. या विजयासह सिंधूचा चीनच्या या खेळाडूंविरुद्धचा रेकॉर्ड ६-९ असा झाला. सिंधूने बिगजियाओविरुद्ध सलग चार सामने गमावले होते. सिंधूला सुरुवातीला सूर गवसला नव्हता.
बिगजियाओने पहिल्या गेममध्ये सुरुवातीस ७-३ आणि बे्रेकनंतर ११-६ अशी आघाडी मिळविली. सिंधूने ब्रेकनंतर चुका केल्यामुळे गुणसंख्या १८-९ अशी झाली. सिंधूने धडाकेबाज पुनरागमनाची झलक देत सलग नऊ गुण वसूल केले. यानंतरही सलग तीन गुण मिळवून सिंधूने पहिला गेम जिंकला. दुसºया गेममध्येही सिंधूने ११-६ अशी आघाडी मिळवली होती. (वृत्तसंस्था)